चंद्रपूर शहरात ४८.५ टक्के तापमान नोंदले गेले आहे. तसे झाले की ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा सुरू होते. चंद्रपूर जवळ भरपूर खाणी आहेत. तिथे काही कारखानेही झाले आहेत आणि त्यामुळे हे तापमान वाढले आहे असे निदान करण्याचा मोह काही लोकांना होत आहे. खरे तर चंद्रपुरातले हे उद्योग आता आता झाले आहेत पण तिथे तापमानाची नोंद मात्र १०० वर्षांपासूनच जास्त होत आहे . मग १०० वर्षांपूर्वी तिथे तापमानाची अशी नोंद का झाली नव्हती ? कारखान्यांची संख्या वाढली की तापमान वाढते असे म्हटले जाते पण कारखाने तर मुंबईत मोठया प्रमाणावर आहेत. आणि त्यांची परंपरा १०० वर्षांपेक्षा जुनी आहे. मग मुंबईत तर चंद्रपूरपेक्षा जास्त तापमान नोंदले पाहिजे पण चंद्रपुरात तापमापकातला पारा ५० अंशाला स्पर्श करत असताना मुंबईत मात्र तो ४० अंशापर्यंतही चढत नाही, असे का ? याचा अर्थ असा की, ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा होत असली तरी आणि त्याचे काही संदिग्ध पुरावे समोर दिसत असले तरीही आता चंद्रपुरात होत असलेल्या तापमानाच्या उच्चांकाशी या प्रक्रियेचा काही संबंध नाही. चंद्रपुरातले उच्चांक तर त्याच्या भौगोलिक रचनेशी संबंधित आहे.
ग्लोबल वॉर्मिंग !
केवळ चंद्रपूरच नाही तर सार्या विदर्भातच तापमानाचा कहर झाला आहे. विदर्भ हा मध्य भारतातला भाग आहे. त्यामुळे हा भाग परंपरेने अधिक उन्हाळ्याचा आहे. विदर्भातले चंद्रपूर हे शहर तर दरसाल सर्वाधिक तापमानाचे गाव म्हणून ओळखले जाते. आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे की, जगातले सर्वात थंड मानवी वस्ती असणारे सिमला हे शहर आपल्या देशात हिमाचल प्रदेशात आहे आणि सर्वाधिक तापमानाची नोंद असलेले कोटा हे शहर आपल्याच देशात राजस्थानात आहे. कोटा शहरात कधी काळी ५० अंश सेल्सीयस कमाल तापमानाची नोन्द झालेली आहे. तशी ती नेहमीच होत असते असे नाही पण तापमानाचा हा उच्चांक या शहराने एकदा का होईना पण नोंदला आहे. असे कमाल तापमान नेहमीच नोंदणारा अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटातला डेथ व्हॅली हा भाग मात्र ५० अंशा सेल्सीयस तापमानाची नांेंद नेहमीच करीत असतो. अर्थात म्हणूनच त्याला डेथ व्हॅली म्हटले जाते. तिथले या तापमानाचे कारण वेगळे आहे, आधीच हा भाग वाळवंटाचा आहे आणि तिथे केवळ दगड आहेत. दगड फार तापतात आणि लवकर थंड होत नाहीत. रात्री १२ वाजताही ते तप्तच असतात. चंद्रपूर हे शहर आता या डेथ व्हॅलीच्या आसपास पोेचायला लागले आहे. तिथे काल ४८.५ अंश तापमान नोंदले गेले आहे. असे ऊन तापायला लागले की अनेक तज्ज्ञ त्याची कारणमीमांसा करायला पुढे सरसावतात आणि त्यातून अनेक वैज्ञानिक अंध:श्रद्धा निर्माण होतात. ग्लोबल वॉर्मिंग अशीच अंध:श्रद्धा आहे. कारण अजून तरी ग्लोबल वॉर्मिंगला शास्त्रीय मान्यता मिळालेली नाही. त्याचे काही परिणाम जाणवत आहेत पण ते अतीशय सूक्ष्म आहेत. जंतूंच्या काही जाती वातावरणातल्या या बदलामुळे कायमच्या नष्ट होत आहेत. काही ठिकाणचा बर्फ वितळत आहे आणि त्यामुळे नद्यांची पातळी वाढून समुद्राचीही मर्यादा ओलांडली जात आहे. ही सारी अलीकडच्या २०-२५ वर्षातली चर्चा आहे. वातावरणावर होणार्या अशा परिणामांची निश्चिती करताना एवढया किरकोळ बदलांचा आणि एवढ्या अल्प काळच्या नोंदींचा पुरावा पुरेसा नसतो. वातावरणातले बदल हे अनेक शतके नोन्दवावे लागतात. आपण आज तापमानात वाढ होत असल्याचे म्हणत असलो तरीही ही वाढ होण्यास इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या सर्वांच्या काही दशकांच्या नोंदी ठेवाव्या लागतात तरच एखाद्या निष्कर्षाप्रत येता येते. अजून तरी शास्त्रज्ञांचा एक गट ग्लोबला वॉर्मिंग ही कल्पनाच स्वीकारायला तयार नाही. औद्योगीकरणाला गेल्या दीड शतकांत गती मिळाली आहे पण या काळात उद्योगांच्या वाढीमुळेच तापमान वाढले असल्याचे नि:संदिग्धपणे दिसलेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
तापमानात एक सूक्ष्म वाढ होत आहे आणि ती प्रक्रिया ३०० वर्षांपासून सुरू होऊन आता पृथ्वीचे सरासरी तापमान केवळ ०.५ अंश सेल्सीयसने वाढले असल्याचे असे दिसून आले आहे. या पलीकडे आजकाल ऊन फार वाढले असे म्हणायला काही जागा नाही असा त्यांचा दावा आहे. चंद्रपूर आणि विदर्भात झालेली तापमानाची वाढ ही मुळात वाढच नाही. असे तापमान अनेक वर्षांपासून नोंदले गेले आहे. त्यात नवे काही घडलेले नाही. असेच उच्चांकी तापमान ५९ वर्षांपूर्वी नोंदले गेले होते. तेव्हा काही औद्योगीकरण झाले नव्हते. तेव्हा तापमानात वाढ होणे ही नैसर्गिक घटना आहे. कोठे किती तापमान असावे हे तिथे उन्हाची किरणे कशी पडतात यावर अवलंबून असते. जिथे ही किरणे सरळ पडतात तिथे तापमान जादा असते. जिथे ती तिरपी पडतात तिथे तापमान तुलनेने कमी असते. केवळ विदर्भातच नाही तर पूर्ण मध्य भारतात ही किरणे सरळ पडतात. शिवाय आता दिवस १४ तासांचा आणि रात्र १० तासांची असते. त्याचा परिणाम म्हणूनही तापमान वाढलेले असते. २१ जूनला दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला लागते. तेव्हा तापमान कमी व्हायला सुरूवात होते. ही निसर्गाची किमया आहे. त्यावर मानवाला फारसे काही करता येत नाही.