सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता हवी : प्रीती झिंटा

स्पॉट फिक्सिंगमुळे देशभरात खळबळ माजली असताना आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मालक नेस वाडिया आणि सिनेतारका प्रीती झिंटाने वेगळाच सूर लावला आहे. स्पॉट फिक्सिंग सारखे गैरप्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रीती झिंटाने काही सूचना केल्या आहेत.

तिच्या पहिल्या सूचनेप्रमाणे, आयपीएलमधील संघांच्या मालकांना आयपीएल गव्हर्निंग कौ’सिलमध्ये स्थान मिळायला हवे. या बरोबरच आयपीएलमधील सर्व खेळाडूंची पोलीग्राफ चाचणी घेण्यात यावी, असे तिने सुचवले आहे. स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकारांवर अधिक लक्ष घालून कणखर पावले उचलली पाहिजेत. सट्टेबाजीला जर कायदेशीर मान्यता दिली, तर भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. ज्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंगचा मार्ग स्वीकारला आहे, तो त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आहे.

त्यामुळे आयपीएल स्पर्धेकडे अंगुलीनिर्देश करता येणार नाही, हे तिने स्पष्ट केले. उत्तेजक सेवन प्रकरणी जशी सर्व खेळाडूंमधून निवडक चाचणी घेतली जाते. त्याप्रमाणे आयपीएलमधील खेळाडूंचीही पोलीग्राफ चाचणी घ्यावी, अशी मागणी प्रीती झिंटाने केली. मालक नेस वाडियाने व्यथा मांडली की, वर्षभर आम्ही मागणी करत आहोत की, आयपीएलमधील संघ मालकांना गव्हर्निंग कौंसिलमध्ये स्थान द्या; पण ही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. या मागणीमुळे संघ मालकांना बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसमवेत काम करणे शक्य होईल.

Leave a Comment