फिक्सिंग कोठे नाही ?

भारतात तर शिक्षणापासून चित्रपटापर्यंत सर्वत्र फिक्सिंग आहेच पण भारतीय लोक परदेशातही फिक्सिंग करीत असतात. भारतातल्या एका बड्या उद्योगपतीने अमेरिकेच्या अध्यक्षांना पाकिस्तानातल्या राजकारणाविषयी काही विनंती केली होती. पाकिस्तानातला एक नेता मुळात आपला गाववाला असल्यामुळे अमेरिकेने त्याला निवडून आणावे आणि तशा सूचना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना द्याव्यात अशी विनंती त्याने केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे काम केल्यास तो उद्योगपती भारतातले तेल उत्खननाचे कंत्राट अमेरिकेच्या कंपनीला मिळावे म्हणून संबंधित निविदेत हस्तक्षेप करणार होता. मग अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्या उत्खनन कंपनीला पाकिस्तानच्या निवडणुकीत गुंतवणूक करायची सूचना दिली. तसे झाले. तो नेता निवडून आला. अमेरिकेच्या कंपनीला भारतातले कंत्राट मिळाले आणि बदल्यात भारतीय उद्योगपतीला पाकिस्तानातली अनेक कंत्राटे मिळण्याची सोय झाली. पाकिस्तानात तो नेता निवडून आल्यामुळे तिथे आता लोकशाहीची पहाट उगवली असल्याचा साक्षात्कार जगातल्या अनेक समीक्षकांना आणि राजकीय निरीक्षकांना झाला. पण ती निवडणूक म्हणजे एक फिक्सिंग होती हे फार कमी लोकांंना माहीत होते.

भारतात निवडणुका झाल्या की कोणाला कोणते खाते मिळावे याबाबत अनेक लॉब्या कामाला लागतात आणि मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचेही फिक्सिंग होते ही गोष्ट अनेकदा सिद्ध झाली आहे. ए. राजा यांना तेच खाते मिळावे म्हणून किती कंपन्या आणि पत्रकार कार्यरत होते याची माहिती काही आता लपून राहिलेली नाही. जयपाल रेड्डी यांचे पेट्रोलियम खाते अशाच एका प्रकारात गेलेले आहे याची चर्चा गतवर्षी विपुलतेने झाली आहे. भारत-पाक-इराण या गॅस पाईप लाईनचा आग्रह धरल्याबद्दल एका मंत्र्याचे खाते असेच अमेरिकेने डोळे वटारताच काढून घेण्यात आले होते. कोणाला कोणते खाते द्यावे हा पंतप्रधानांचा अधिकार आहे असे आपण म्हणतो पण ते काही खरे नाही. प्रत्यक्षात अनेक क्षेत्रात फिक्सिंग सुरू असते तशी मंत्रिमंडळाच्या रचनेतही फिक्सिंग होत असते. राजकारण हा तर फिक्सिंगचाच खेळ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावर नजर ठेवून बरेच मोठे फिक्सिंग होत असतेे. या पदासाठीचा आपला आगामी प्रतिस्पर्धी आपल्या पक्षाचा असला तरीही तो निवडून येऊ नये यासाठी नेते मंडळी विरोधी पक्षांशी फिक्सिंग करीत असतात.

या निवडणुकीत कोण कोणाचा प्रचार करीत आहे याचा सामान्य माणसाला बोधही होत नाही. दिसायला पक्ष निरनिराळे दिसत असतात पण एखाद्या नेत्याची अनेक पक्षात आपली म्हणून काही माणसे असतात. त्यांना निवडून आणण्यासाठी तिथे आपल्या पक्षाचा ‘वीक’ उमेदवार उभा करून एक निराळीच फिक्सिंग केली जात असते. आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट फिक्सिंग मार्फत ठरत असते. आपण मात्र त्यांना निरनिराळी नावे देत असतो. शेतकर्‍यांचा माल लिलावाने विकला जातो. लिलाव चढा ओढीने केला जातो पण लिलाव करणार्‍या व्यापार्‍यांनी लिलाव कोठे थांबवायचा याचे फिक्सिंग आधीच केलेले असते. क्रिकेटच्या मैदानावर २२ खेळाडू खेळत असतात आणि त्यातल्या कोणी कधी बाद व्हायचे याचे निर्देश सट्टा बाजारातून आधीच दिलेले असतात. ही गोष्ट आता उघड झाली आहे. अशा फिक्सिंगमध्ये जे खेळाडू मूर्खासारखे वागले त्यांना पकडण्यात आले आहे पण या प्रकारात जे निष्णात आहेत ते पकडले गेलेले नाहीत. काही फिक्सर्स तर खासदार झाले आहेत. निवडणुका आणि संसद यांची ही किती मोठी विटंबना आहे असे आपल्यासारख्या पापभीरू लोकांना वाटते पण मुळात संसदच जर फिक्स्ड आहे तर तिथे क्रिकेटमधले फिक्सर्स जाऊन बसल्याने असे काय बिघडणार आहे असे कोणताही जाणकार माणूस म्हणेल.

क्रिकेटच्या फिक्सिंगची चर्चा सुरू आहे पण तिला काल वेगळे वळण लागले. या फिक्सिंगचा बॉलीवूडशी संबंध असल्याचे दिसून आले. आजवर काही बॉलीवूड कलाकार दाऊदच्या दरबारात हजेरी लावत होते आणि काही निर्माते त्याच्याच सूचनेवरून आपल्या चित्रपटांचे नायक आणि नायिकांची निवड करीत होते असे आपण काही वर्षांपूर्वी पाहिले आहे. म्हणजे चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्यातले लागेबांधे स्पष्ट झाले होते. पण आता बॉलीवूड आणि आयपीएल यांच्यातले अनैतिक संबंधही उघड झाले आहेत. गतवर्षी भारतात मोटोक्रॉस शर्यत झाली. ती बघायला काही चित्रपट कलाकार आले होते. ते काही या स्पर्धेसाठी आले नव्हते तर याही क्षेत्रात आपला काळा पैसा गुंतवून काही पटीने वाढवण्याची संधी आहे का याचा शोध घ्यायला आले होते. खरे तर विंदू दारासिंग याच्या अटकेचे काहीही कौतुक वाटायला नको आहे. कारण आता आपण आपल्या मनाशी एक खुणगाठ बांधून ठेवायला हवी आहे की, जिथे जिथे काळापैसा आणि ईझी मनी गुंतवला जातो तिथे फिक्सिंग असते. लोकांना अन्य काही दुसरेच भासवले जाते.

Leave a Comment