बड्या बड्या राष्टयांच्या नेत्यांना कामाचा ताण किती आणि कसा असतो याची सर्वसाधारण कल्पना करता येते. कामाच्या धबडग्यात सापडलेल्या या नेत्यांना कंटाळा येतच असणार. शिवाय ताणतणावाचे आयुष्य सतत जगावे लागत असल्याने तणाव मुक्तीसाठीही कांही ना कांही त्यांना करावे लागत असणारच. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलिया गिलार्ड याही याला अपवाद नाहीत. त्यांनाही ताणास सामोरे जावे लागते तसेच कंटाळाही येतो.
कामाचा ताण नाहिसा करण्यासाठी दूरदर्शनवर सिनेमे पाहणे आणि विणकाम करणे मी पसंत करते असे त्यांनी नुकत्याच एका स्थानिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. कायली सँडीलँड आणि जॅकी हेंडरसन यांनी ही मुलाखत घेतली होती. गिलार्ड यांनी यावेळी आपल्या वैयत्तिक आयुष्यातील कांही गोष्टीही मनमोकळेपणाने सांगितल्या. सध्या एक उबदार कार्डिगन विणण्याचे काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.
देशाच्या सर्वाधिक महत्त्वाच्या कार्यालयावर आपले वर्चस्व गाजविणार्या जुलिया यांना गाण्याविषयी मात्र भीती वाटते. त्या म्हणाल्या की आमचे सारे कुटुंबच सर्वांसमोर गाणे गाताना घाबरलेले असते. ऑस्ट्रेलियन नागरिकांना माझ्या गाण्याच्या भीषण शैलीची धास्ती बसू नये अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त करून आपल्या विनोदबुद्धीचेही दर्शन घडविले.