लंडन दि. २२- तालिबान्यांबरोबर सुरू असलेल्या युद्धात ब्रिटीश सैनिकांना जीव धोक्यात घालून मदत करणार्या ६०० अफगाणी लोकांना ब्रिटनमध्ये राहण्याचा हक्क प्रदान करण्यात येत असून त्यांना पाच वर्षांचा व्हीसा देण्यात येणार आहे. यात संबंधित दुभाष्यांबरोबर त्यांच्या कुटुंबानाही ही सवलत दिली जाणार आहे.
युद्धकाळात सीमेवर या दुभाष्यांनी ब्रिटीश सैन्याकरता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटीश सैन्य २०१४ च्या अखेरीस हेमलँड परिसरातून माघारी जाणार आहे. ब्रिटीश माघारी गेल्यानंतर त्यांना मदत करणार्या या दुभाष्यांना जीवे मारण्याच्या धमक्या तालिबानी सातत्याने देत आहेत. त्यामुळे त्यांना ब्रिटनमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. ज्यांना ही सुविधा मिळणार नाही त्यांना १८ महिन्यांचा पगार अथवा उपयुक्त शिक्षण मोफत दिले जाणार आहे असेही समजते.
२००१ पासून या भागात सुरू असलेल्या युद्धात २० दुभाषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर पाच जणांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकारेच यूएस. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनीही अफगाणी मदतगार दुभाषांना त्यांच्या देशात आश्रय घेण्याची परवानगी यापूर्वीच दिली आहे.