मुंबई दि.२१ – देशाच्या स्मार्टफोन बाजारात कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंग ने त्यांचा नवीन सॅमसंग गॅलॅक्सी ग्रँड क्वाट्रो हा स्मार्टफोन सादर केला असून त्याची किंमत आहे १७२९० रूपये. या फोनच्या सादरीकरणामुळे सॅमसंग ने त्यांच्या स्मार्टफोन पोर्टफोलियोत १४ स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन ५९९० रूपयांपासून ते ४१५०० रूपयांपर्यंच्या रेंजमधील आहेत.
कंपनीचे कंट्री हेड विनित तनेजा म्हणाले की ग्रँड क्वाट्रो या आमच्या नव्या स्मार्टफोनला मिळत असलेली ग्राहकांची पसंती आमच्यासाठी उत्साहवर्धक ठरली आहे. या फोनच्या खरेदीवर सध्या रू.३००० किमतीचे डिजिटल वॉलेट भेट म्हणून दिले जात आहे. या फोनचा स्क्रीन ४.७ इंचाचा असून त्यात दोन सीमकार्ड वापरण्याची सुविधा आहे. पाच मेगापिकसल कॅमेरा, अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम आणि ८ जीबीची मेमरी ही त्याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत.
२०१० मध्ये पहिला गॅलॅक्सी फोन कंपनीने भारतात सादर केल्यानंतर आत्तापर्यंत १ कोटी पेक्षा अधिक गॅलॅक्सी फोन कंपनीने विकले असल्याचेही तनेजा यांनी सांगितले.