सात मिनिटे, सहा चेंडू – बुकीने कमावले तब्बल अडीच कोटी

नवी दिल्ली दि.२१ – नऊ मे चा दिवस. मोहालीचे स्टेडियम. राजस्थान रॉयल्स संघ बॉलिंग करतोय. श्रीशांतचे दुसरे षटक सुरू आहे. किती रन द्यायच्या हे फिक्स करूनच तो बॉलिंग करतोय. सात मिनिटांत त्याचे सहा बॉल संपतात आणि बुकी चंद्रेश पटेल या सात निमिटांत कमावतो तब्बल अडीच कोटी रूपये. विश्वास बसतोय? नाही नां ? पण हे सत्य आहे आणि ते सांगितलेय खुद्द दिल्ली पोलिस कमिशनर नीरजकुमार यांनीच.

नीरजकुमार आयपीएल ६ सिरीजमधील या सामन्याविषयी माहिती देताना सांगतात या सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाले आणि त्यावर लागलेले स्टेक फार मोठे होते. बुकी पटेल एका रात्रीत कोट्याधीश बनला. अंधेरीत राहणारा पटेल यालाही अन्य तेरा बुकींबरोबरच पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुंबईच्या रियल इस्टेटमध्येही कोट्यावधींची गुंतवणूक केली आहे.

नीरजकुमार सांगतात श्रीशांतच्या चौकशीत आम्हाला असेही आढळले की त्याच्याबरोबरच चंदिला आणि चव्हाण हेही फिक्सिंगमध्ये आहेत याची त्याला कल्पना नव्हती. त्याचा समज असा होता की तो एकटाच या प्रकरणात आहे. मात्र चंदिला आणि चव्हाण यांनी अन्य बुकींशी संपर्क साधलेला होता. या सर्वांची बुकींबरोबरची तसेच मध्यस्तांबरोबरची संभाषणे आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याविरूद्ध आमच्याकडे भक्कम पुरावाही आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम किवा त्याचा साथीदार टायगर मेमन यांचा मात्र या स्पॉट फिक्सिंगशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचेही नीरजकुमार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मध्यस्त भारताबाहेर होते आणि तेथून बुकींशी संपर्कात होते. मार्च महिन्यातच मध्यस्त परदेशी बोलत असताना ते अंडरवर्ल्डशीच बोलत असावेत असा संशय दहतशवाद विरोधी पथकाने ऐकलेल्या संभाषणातून निर्माण झाला होता. त्यातूनच या क्रिकेटपटूंची नांवेही आम्हाला समजली होती. मात्र बुकी मध्यस्तांशी बोलत होते आणि त्यासाठी कोड नावांचा वापर करत होते हे आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment