उ. कोरियाने रविवारी केली पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

सेऊल, दि.२० – दक्षिण कोरिया आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वहभूमीवर केलेल्या आवाहनांना न जुमानता उत्तर कोरियाने आज आणखी एका लघुपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. रविवारी दुपारी उत्तर कोरियाच्या पूर्व किनार्‍यावरून ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती त्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. उत्तर कोरियाची ही गेल्या दोन दिवसांतील चौथी अशा प्रकारची चाचणी आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान-की-मून यांनी उत्तर कोरियाला ही वेळ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करण्याची नसून आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर चर्चेस पुन्हा सुरुवात करण्याची आहे, असा सल्ला दिला होता.

उत्तर कोरियाकडून शनिवारी तीन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती. उत्तर कोरियाकडून अशा प्रकारच्या चाचण्या नेहमीच घेण्यात येतात. मात्र, फेब्रुवारीत अणुचाचणी घेतल्यानंतर अमेरिकेने या देशावर कडक निर्बंध घातले. त्यातच, दक्षिण कोरियासह अमेरिकेने संयुक्तरित्या लष्करी सरावात भाग घेतल्याने उत्तर कोरिया भडकला आहे.