आता अंदमान निकोबार बेटेही नकाशातून गायब

पुणे दि.२० – भूगोलाच्या पुस्तकात अरूणाचल प्रदेश चीनला दान करून टाकण्याचा पराक्रम करणार्या२ महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती विभागाने म्हणजे बालभारतीने आता इतिहासाच्या पुस्तकातील नकाशातून लक्षद्विप तसेच अंदमान निकोबार बेटेही भारताच्या नकाशातून पुसून टाकण्याची कामगिरी केली आहे. इतिहासाच्या दहावीच्या पुस्तकात भारताच्या राजकीय नकाशातून ही बेटे गायब करण्यात आली आहेत. अरबी, हिंदी महासागर आणि बंगालच्या खाडीचा नकाशात समावेश करताना भारतातील हे दोन केंद्रशासित प्रदेश मात्र कुठेच नोंदविले गेलेले नाहीत असे समजते.

यापूर्वी भूगोलाच्या पुस्तकातून अरूणाचल प्रदेश चीनला दान केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण विभागाने १६ मे रोजी काढलेल्या पत्रकात इतिहासाच्या पुस्तकातही चुका झाल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मराठी पुस्तकात या बेटांची उपस्थिती दिसत नसली तरी त्यांची निदान नांवे तरी आहेत. मात्र इंग्रजी पाठ्यपुस्तकात नांवे ही नाहीत आणि बेटेही नाहीत अशी परिस्थिती आहे.

याविषयी आपले मत व्यक्त करताना भूगोलाचे प्रोफेसर विद्याधर अमृते म्हणाले की हे नकाशे प्रसिद्ध करताना संस्थेने सर्वे ऑफ इंडियाची परवानगी घेतलेली दिसत नाही. कारण परवानगी घेतली असती तर हे नकाशे पूर्ण तपासून मगच प्रकाशित केले गेले असते. मराठीच्या पुस्तकात याच नकाशात श्रीलंका हा देशही दाखविला गेलेला नाही.

बालभारतीने आपल्या सर्व नऊ डेपोंना या पुस्तकांची विक्री ताबडतोब थांबविण्याच्या सूचना जारी केल्या असून शिल्लक राहिलेल्या पुस्तकात या चुका सुधारून देण्यात येणार आहेत असे सांगितले आहे. त्यानुसार बालभारतीला १.२ लाख मराठी व ८.७१ लाख इंग्रजी भाषेतील इतिहासाच्या पुस्तकांत दुरूस्ती करावी लागणार आहे.

Leave a Comment