नवी दिल्ली दि.२० – चेकोस्लोव्हाकियाची प्रमुख कार उत्पादक कंपनी स्कोडा त्यांचे भारतातील हचबॅक श्रेणीतील फॅबिया या कारचे उत्पादन बंद करण्याच्या विचारात आहे. कंपनीने पुढील वर्षात नवीन मॉडेल्स आणण्याची तयारी चालविली असल्याने फॅबियाचे उत्पादन बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रवक्ते म्हणाले की स्कोडा कंपनी आपली सेदान श्रेणीतील नवीन मॉडेल श्रृंखला अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. तशी प्रक्रिया सुरूही झाली आहे. २०१३-१४ सालात कंपनी विविध सेदान मॉडेल्स बाजारात आणत आहे. मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात फॅबियाच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे हे त्यामागे मुख्य कारण आहे. वाहन उत्पादक संघटनेच्या आकडेवारीनुसार कंपनीने २०१२-१३ सालात फक्त ३३४३ गाड्या विकल्या आहेत. हेच प्रमाण गेल्या वर्षात १४९३६ गाड्या इतके होते.