आपला तळहात किंवा हाताचा पंजा मोबाईल म्हणून वापरता आला तर? ही कल्पना कितीही रम्य वाटली तरी ती प्रत्यक्षात येईल का अशी शंका घेण्याचे आता कारण उरलेले नाही. त्यामागे आहेत एका जपानी संशोधकाचे प्रयत्न. त्याने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की ज्यामुळे आपण आपल्या हाताचा पंजा संगणक, मोबाईल अथवा स्मार्टफोन म्हणूनही वापरू शकणार आहोत. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरायला दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आले की तुम्हाला मोबाईल, संगणक अथवा की बोर्ड जवळ बाळगण्याच्या झंझटातून सुटका मिळणार आहे. कारण हात हाच जर मोबाईल म्हणून काम करणार असेल तर हात आपल्याबरोबर नेहमी असतोच. मासातोशी इश्कवारा या जपानी संशोधकाने टोकियो विद्यापीठात संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि त्यात हायस्पीड व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. १ कॅमेरा आणि दोन फिरणारे आरसे अशी सामग्री त्यासाठी वापरली गेली आहे. त्यानुसार युजरला तळहात की बोर्ड किवा डिस्प्ले म्हणून वापरता येणार आहे.
या तंत्रज्ञानाने मिळविलेली फोनची इमेज हातात धरून युजर कुठेही जाऊ शकेल. चालताना अथवा पळतानाही हा डिस्प्ले हलणार नाही कारण हात्या वस्तू ट्रॅक करण्याची प्रणाली त्यासाठी तयार केली गेली आहे. इतकेच नव्हे तर तळहातावर मोबाईलचे बटण दाबले की त्याच्या संवेदनाही जाणवू शकणार आहेत. हाच कीबोर्ड वापरून तुम्ही कॉलही करू शकणार आहात.
याच संशोधकाने यापूर्वी हायस्पीड व्हीजन तंत्रज्ञानाचा वापर करून रोबो हात बनविण्याची कामगिरीही केली आहे. हा हात मानवी हाताच्या ३३ पट अधिक वेगाने कोणतेही काम करू शकतो.