नवी दिल्ली, दि.२० – रिलायन्सचे संचालक मुकेश अंबानी यांच्या झेड सुरक्षेची जबाबदारी नुकतीच घेतलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)ने स्थानिक दलाच्या सहकार्याशिवाय अंबानी यांना झेड सुरक्षा प्रदान करण्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. सीआरपीएफने याबाबत नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यात अंबानी यांच्यावर हल्ला झालाच तर आपल्या जवानांना तोंड द्यावी लागणारी परिस्थिती दलाने विशद केली आहे.
झेड सुरक्षा पुरविण्यात आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा देशात ठिकठिकाणी संचार असतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना या सुरक्षेबरोबर स्थानिक पोलीस पुरविण्याची मागणी सीआरपीएफने या पत्रात केली आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांच्या प्रदेशवर्णनाची माहिती आणि स्थानिक गुप्तचर ही सुरक्षा दिणाऱ्या २८ सदस्यीय पथकाला पुरविण्याचीही दलाची मागणी आहे.
मुकेश अंबानींना सुरक्षा दिलेल्या पथकामध्ये देशाच्या विविध भागांतील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा पुरविलेल्या व्यक्तींचे अस्तित्व असलेल्या ठिकाणांची व सुटकेच्या मार्गांची माहिती नसते, असे कारणही सीआरपीएफने यामागे दिले आहे. मुकेश अंबानींना यांना आलेल्या धमक्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेला असणार्या धोक्याचे विश्लेषण केले. त्यानंतर सीआरपीएफने आपली २८ कमांडोजचे पथक त्यांच्या झेड सुरक्षेसाठी तैनात केले आहे.
मुकेश अंबानी यांना पुरविण्यात आलेल्या झेड सुरक्षेत एक पायलट व इतर वाहनेही देण्यात आली आहेत. या वाहनांवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज कमांडो तैनात असतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २८ कमांडोंचा त्यात समावेश आहे. हे जवान अंबानीच्या सुरक्षेसाठी मुंबईसह देशात इतरत्रही डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.