आठवलेमुळे होणार जोशी सरांची अडचण

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महायुतीतल्या रिपब्लिकन पक्षाने आतापासूनच काही जागा मागितल्या आहेत. इकडे शिवसेनेतर्फे कल्याण मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असतानाच, हा मतदारसंघ महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडावा, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. त्यामुळे आगामी काळात जोशी सरांची अडचण वाढली आहे. रिपब्लिकन पक्षाने कल्याणसह पुणे, दक्षिण मध्य मुंबई, लातूर आणि रामटेक या मतदारसंघाची मागणी केली आहे.

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यावी ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. एका विशिष्ट उद्दिष्टांसाठी आपण सेना-भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. दरवेळी राजकीय भूमिका बदलणा-यांपैकी आपण नाहीत, अस खुलासा यावेळी आठवले यांनी केला. राज्यसभा आपल्यासाठी महत्त्वाची नाही. सामान्य रिपब्लिकन कार्यकर्त्याला सत्तेत वाटा व सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

जागावाटपात आमची मागणी केवळ शिवसेनेकडे नसून भाजपने आमच्यासाठी जागा सोडण्याची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाने कल्याणसह पुणे, दक्षिण मध्य मुंबई, लातूर आणि रामटेक या मतदारसंघाची मागणी केली आहे. यामधील काही जागा भाजपच्या आहेत. भाजपने यापुढील काळात आमच्याकडे केवळ ​शिवसेनेचे मित्र म्हणून पाहू नये, असेही आठवलेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment