बीसीसीआयने बोलावली उद्या तातडीची बैठक

मुंबई : आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे सर्वत्र सध्या खळबळ माजली आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक येत्या रविवारी १९ तारखेला चेन्नईत होणार आहे. आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल संघाचे श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण स्पॉट फिक्सिंगमध्ये सध्या कोठडीची हवा खात आहेत. या तीन खेळाडूबाबत महत्वाचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यांच्यावर आगामी काळात अजन्म बंदी घालण्याची कारवाई होऊ शकते.

क्रिकेटमध्ये आतापर्यंत उघडकीस आलेली फिक्सिंगची सर्व प्रकरणे एकतर पोलिसांच्या तपासामुळे किंवा स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाली आहेत. फिक्सिंगचे हे प्रकार उघडकीस झाल्यावर आयसीसी आणि बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून ठोस कारवाई करण्याची भाषा बोलली जाते. भविष्यात असे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून या तातडीच्या बैठकीत बीसीसीआय ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment