कोळसा घोटाळ्यातील तपास अधिका-याला लाच घेताना अटक

नवी दिल्ली: कोळसा घोटाळ्यातील सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी विवेक दत्त यांना १५ लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली. दिल्लीतील सीबीआयच्या दक्षता पथकाने दत्त यांना लाच घेत असताना शनिवारी अटक केली. दत्त हे सीबीआयमधील अधीक्षक स्तराचे अधिकारी आहेत.

जमीनीचा वाद मिटवण्यासाठी दत्त ही लाच घेत होते. त्याचबरोबर दत्त यांच्यासह एका निरीक्षक दर्जाच्या अधिका-याला देखील या लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.विवेक दत्त हे केंद्र सरकारच्या कोळसा घोटाळ्याचे मुख्य तपास अधिकारी आहेत.

मात्र या लाचखोरीचा कोळसा घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे दिल्लीतील सीबीआयच्या दक्षता पथकाने स्पष्ट केले आहे. देशभरात कोळसा घोटाळा गाजत असतना या प्रकरणाची चौकशी करणा-या अधिका-यानेच लाच घेतल्याने याबाबतचा संभ्रम वाढतच चालला आहे.