कराची, दि.१८ -पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांवेळी कराची मतदारसंघामध्ये गैरप्रकाराचे आरोप झाल्यामुळे काही केंद्रांत फेरमतदान घेण्यात येणार आहे. मात्र, निवडणूक आयोग आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने (एमक्यूएम) वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे फेरमतदानावरून पेच निर्माण झाला आहे.
कराची मतदारसंघात फेरमतदानाबाबत पेच
पाकिस्तानात ११ मे यादिवशी मतदान झाले. त्यावेळी पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीच्या कराची मतदारसंघात (क्रमांक २५०) गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले. याशिवाय, काही केंद्रांवर उशीराने मतदान सुरू करण्यात आल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने ४३ केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया थांबवली. आता या मतदारसंघातील नेमक्या किती केंद्रांवर फेरमतदान घ्यायचे याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडवण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने एमक्यूएम, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षांच्या नेत्यांची आणि सिंध प्रांताच्या अधिकार्यांरची बैठक बोलावली होती.
कराचीच्या २५० क्रमाकांच्या मतदारसंघातील सर्व १८५ केंद्रांवर फेरमतदान घ्यावे, अशी मागणी एमक्यूएमने लावून धरली. तर, पीटीआयने कराचीतील केवळ एकाच नव्हे तर सर्वच मतदारसंघांमध्ये फेरमतदान घ्यावे, असा आग्रह धरला. याउलट, आयोगाने मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या केवळ ४३ केंद्रांवरच फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली. या भिन्न भूमिकांमुळे फेरमतदानाबाबतची कोंडी फुटू शकली नाही.