स्पॉट फिक्सिंगच्या मागे ‘डी गँग’

मुंबई: आयपीएल क्रिकेट स्पर्धांमधील स्पॉट फिक्सिंगच्या मागे दुबईस्थित आंतराराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहीम याच्या डी गँगचा वरदहस्त असल्याची पोलिसांना खात्री पटली असून या प्रकरणी दाऊदशी घनिष्ट संबध असलेल्या एका बुकीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण या तिघा खेळाडूंसह ११ बुकींना दिल्ली पोलिसांनी नियोजनबद्ध रीतीने पुरावे उभे करून अटक आहे. त्याचवेळी या बुकींच्या कार्यपद्धतीवरून त्यांच्या मागे संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा हात असावा; असा पोलिसांचा कयास होता. मात्र त्यावेळी कोणताही ठोस पुरावा हाताशी नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी संशय व्यक्त करण्या पलिकडे कोणतेही विधान केले नाही.

मात्र या प्रकारामागे दाऊदच्या टोळीचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुबई येथील दाऊदचा जवळच बुकी सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई हाच या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. चंद्रेश या बुकीच्या मार्फत सुनील भारतातील रॅकेट चालवित असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

दरम्यान; स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई येथील बुकी आणि फायनान्सर अशा ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १४ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांच्याकडील संगणक आणि मोबाईलवर मिळालेल्या नोंदींवरून त्यांनी आयपीएलमध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा सट्टा घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

या संशयितांचा प्रत्यक्ष आयपीएल खेळाडूंशी संपर्क असल्याचे कोणतेही घागेदोरे हाती आले नसून चेन्नई पोलीस सध्या तरी या आरोपींचा स्वतंत्रपणे तपास करीत असून त्याचा दिल्ली पोलिसांच्या तपासाशी कोणताही संबंध नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Comment