संजू बाबासाठी येरवड्यातील अंडा सेल सज्ज

पुणे दि.१७ – कालच टाडा न्यायालयासमोर शरणागती पत्करलेल्या संजूबाबाची रवानगी नागपूर, नाशिक अथवा पुण्यातील तुरूंगात केली जाईल असे सांगितले जात असले तरी त्याची रवानगी येरवडा कारागृहातच होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थर रोड जेलमधील कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर संजूबाबांचे नक्की निवासस्थान कोणते हे स्पष्ट होणार आहे.

संजय दत्तला येरवडा कारागृह नवे नाही. याच खटल्यातील शिक्षेचा कांही काळ त्याने या जेलमध्ये घालविला आहे. आत्ताही याच तुरूंगात त्याची रवानगी होईल या दृष्टीने त्याच्या साठी अंडासेल सज्ज करण्यात आला आहे. अट्टल धोकादायक गुन्हेगार अथवा ज्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे त्यांना या सेलमध्ये ठेवले जाते कारण हा सेल तुरूंगातील सर्वाधिक सुरक्षित सेल मानला जातो. अन्य कैद्यांशी त्याचा थेट संबंध येणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही येथील अधिकार्‍यांनी सांगितले.

येथे आल्यास संजूबाबा बेकींग किवा शेती काम करतील असेही समजते. मागील शिक्षेच्या वेळी त्यांनी सुतारकाम केले होते. टाडा न्यायालयाने संजय दत्तला घरचे जेवण मिळण्याची तसेच स्वतःची पातळ गादी, उशी आणि १ महिन्यांसाठीची औषधे बरोबर आणण्याची परवानगी दिली आहे मात्र त्याची इलेक्ट्रोनिक सिगरेट ओढण्याची विनंती अमान्य केली आहे. संजय दत्त याची आता ४२ महिन्यांची शिक्षा भोगणे बाकी आहे.

Leave a Comment