महासेनच्या तडाख्याने बांग्लादेशात १४ ठार

ढाका दि.१७ – गुरूवारी महासेन चक्रीवादळाने बांग्लादेशच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीला धडक दिल्यामुळे किमान १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर लाखो लोक बेघर झाले असल्याचे वृत्त आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका पातुखाली किनारपट्टीवरील खेपुपारा भागाला बसला. कारण येथे वादळ सर्वाधिक वेगाने म्हणजे ताशी ९० किमीच्या वेगाने धडकले आणि नंतर त्याचा जोर ओसरला असे आणीबाणी व्यवस्थापन मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

महासेन बांग्लादेशाला धडक देणार असल्याचे हवामान विभागाने आधीच सांगितल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने या भागातील १० लाख लोकांचे स्थलांतर मदत छावण्यातून केले होते. मात्र तरीही वादळाचा जोर इतका होता की लक्षावधी घरे पत्त्यांप्रमाणे कोसळली, हजारो वृक्ष उन्मळून पडले आणि उभी पिके भुइसपाट झाली असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मरण पावलेल्यांतील बहुसंख्य लोक बुडून अथवा पडणार्‍या झाडांखाली चेंगरल्याने ठार झाले आहेत. या भागातील वीजपुरवठा आणि दळणवळण व्यवस्था कोलमडल्या आहेत.

या वादळाचा फटका बांग्लादेशप्रमाणेच म्यानमार आणि श्रीलंकेलाही बसला. या तिन्ही देशात मिळून १८ जण ठार झाले आहेत. मात्र सर्वाधिक नुकसान बांग्लादेशाचे झाले आहे. हे वादळ आज भारतात त्रिपुरा राज्यात धडकण्याची शक्यता आहे.