नाटयमय अपहरणानंतर सरबजितच्या वकिलाची सुटका

लाहोर, दि.१७ –तुरुंगात कैद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात मृत्युमुखी पडलेल्या सरबजितसिंग या भारतीय कैद्याचे वकील अवैस शेख यांचे त्यांच्या पुत्रासह भारत-पाक सीमेवरून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडली. मात्र, अर्ध्या तासानंतर या दोघांना अहपरणकर्त्यांनी महामार्गावर टाकून दिले.

फार्महाऊससाठी जमीन खरेदी करण्यासाठी शेख आपला मुलगा शाहरूखसह बुरकी हुदैरामधील एका गावात गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या वेशात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. एका पिक-अप ट्रकमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याची माहिती शेख यांचा दुसरा मुलगा हारुणने दिली. या घटनेचे वृत्त कळताच अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. कुठल्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी घेतलेली नाही.

सरबजितसिंगची केस लढविल्यामुळे आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रार शेख यांनी केली होती. लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात सहकैद्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर कोमात गेलेल्या सरबजितसिंगचे २ मे रोजी निधन झाले होते.