चिपांझीने काढलेल्या फोटोंचा लिलाव

लंडन दि. १७ – अवर मास्को थ्रू आईज ऑफ मिक्की या फोटोंचा संग्रह लंडनमध्ये पाच जून रोजी होणार्या- लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे आणि त्याला तब्बल ७० हजार पौंडांची बोली मिळेल असे लिलाव कर्त्यांचे म्हणणे आहे.

या विषयी मिळालेली माहिती अशी की रशियन कलाकार विटली कोमर आणि अॅलेझो मेलामिड या दोघांना मास्को सर्कसमध्ये मिकी हा चिपांझी सापडला. त्याची हुषारी पाहून या दोघांनी त्याला कॅमेरा कसा वापरायचा हे शिकविले आणि त्याला फोटो कसे काढायचे याचेही शिक्षण दिले. मिकी या कलेत लवकरच तरबेज झाला आणि त्याने मास्कोतील प्रसिद्ध रेड स्क्वेअरचे अनेक फोटो कॅमेर्‍यात बंदिस्त केले. दरवर्षी या चौकाला लक्षावधी पर्यटक भेट देतात आणि या चौकाचे दररोज असंख्य फोटो काढले जातात अशी ख्याती आहे. आता मिकीच्या नजरेतून हा चौक कसा दिसतो तो कुतुहलाचा विषय आहे. हे फोटो १९९८ साली घेतलेले आहेत. मिकी आता १५ वर्षांचा आहे.

असेही समजते की सारे फोटो अंधुक आणि अस्पष्ट आले आहेत. मात्र मिकी चिपांझीला मास्को असेच दिसत असेल तर कोण काय करणार ? चिपांझीच्या नजरेतून दिसणारे मास्को हेच या फोटोंचे मुख्य आकर्षण असल्याने त्याला किमान ५० ते ७० हजार डॉलर्सची बोली लागेल अशी लिलाव कर्त्यांना खात्री वाटते आहे.

Leave a Comment