नवी दिल्ली दि.१७ – अभूतपूर्व घरसणीनंतर थोडे सावरलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरणीला लागले आहेत. सोन्याचे दर २६१३३ रूपयांवर आले आहेत आणि त्यात अजून घरसण होऊन ते २५ हजारांची पातळी गाठतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. रिझर्व्ह बँकेने उतरते दर लक्षात घेऊन सोन्याची वाढणारी आयात रोखण्यासाठी बुधवारीच १५ हजार बॉण्ड बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर कमी होत असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत आहे. डॉलरची मजबुतीकडे होत असलेली वाटचाल, शेअर बाजाराने पुन्हा घेतलेली उसळी यामुळे सोन्याच्या वायदा किमतीवर दबाव येत असल्याचे समजते. परिणामी मागणी कायम असूनही सोन्याचे दर घसरत चालले आहेत. सिंगापूर बाजारातही सोने निचांकी पातळीवर पोहोचले आहे. तेथे सोन्याचे दर औंसाला १३८७.३० डॉलर्सवर आले आहेत. हे दर २००९ नंतरचे सर्वात कमी दर आहेत.