मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सवर १४ धावांनी मात

मुंबई दि.१५ – राजस्थान रॉयल्सचा १४ धावांनी पराभव करत मुंबई इंडिन्सने आयपीएलच्या सहाव्या हंगामात घरच्या मैदानावरील सर्वच्या सर्व म्हणजे आठ लढती जिंकून आपणच खरे रॉयल्स असल्याचे सिद्ध केले.  प्रथम फलंदाजीकरत मुंबई इंडिन्सने राजस्थानपुढे विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र राजस्थानला 20 षटकात सात बाद १५२ धावा करता आल्या. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात चेन्नईला मागे टाकून पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.

त्याआधी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात दुखापत झाल्यामुळे सचिन तेंडुलकरला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.  मुंबईकडून आदित्य तरेने ३७ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. मात्र मुंबईचे फलंदाज ठरावीक टप्प्याने बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला 20 षटकात आठ बाद १६६ धावा करता आल्या.

मजबूत फलंदाजी असलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. अवघ्या २८ धावांमध्ये त्यांचे चार फलंदाज बाद झाले होते. मुंबईच्या मिचेल जॉन्सन आणि धवल कुलकर्णी यांनी राजस्थाच्या सलामीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. कर्णधार राहुल द्रविड(४), अजिंक्य रहाणे(४) शेन वॉटसन(१९) हे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईचा विजय सोपा झाला. अखेरच्या काही षटकात राजस्थानकडून स्टुअर्ट बिन्नी(नाबाद ३७) आणि ब्रॅड हॉज(३९) यांनी आक्रमक खेळी करुन विजयासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

Leave a Comment