बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात अरुणाचल प्रदेश चीनचा

मुंबई, दि. १६ – चीनने केलेला अरुणाचल प्रदेशवरील आपला मालकी दावा भारताने नाही तरी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाने मान्य केल्याचे दिसते . कारण नुकत्याच बाजारात आलेल्या इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांतून अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून गायब करण्यात आला आहे.

पाठ्यपुस्तक महामंडळाने हा पराक्रम भूगोलाच्या पुस्तकाबाबत केला असून त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या महाभयानक आणि अक्षम्य चुकीबद्दल राज्य शासनाने पाठ्यपुस्तक महामंडळाला स्पष्टीकरण मागवले असून सदोष पुस्तके तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी याबाबत सांगितले की, मी या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून या अक्षम्य चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांचा शोध घेण्यास पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले आहे.

राज्यात शालेय पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन बालभारतीमार्फत केले जाते. यावर्षीसाठी बाजारात दाखल झालेल्या भूगोलाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवण्यात आला असून भारताची सीमा त्याअलीकडे दाखवण्यात आली आहे.
यासंदर्भात पाठ्यपुस्तक मंडळाकडून अद्याप कोणतेही पत्रक अथवा खुलासा जाहीर करण्यात आलेला नाही.

Leave a Comment