पुन्हा मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणे नाही – शिंदे

नवी दिल्ली, दि.१६ -केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, स्वत: शिंदे यांनीच ही शक्यता फेटाळून लावली. पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत कुणीच माझ्याशी बोललेले नाही, असे ते यासंदर्भात म्हणाले.

महाराष्ट्रात नेतृत्वबदल होऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडील सुत्रे शिंदे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, अशी कुजबूज सध्या सुरू आहे. त्याबाबत येथे पत्रकारांनी शिंदे यांना विचारले. त्यावर ते उत्तरले, याविषयी मलाच काही माहिती नाही. कुणीच माझ्याशी या मुद्द्यावर बोलले नाही. महाराष्ट्रात कुठली जबाबदारी स्वीकारण्यासाठी मला पाठवायचे ठरले असते तर कुणीतरी माझ्याशी येऊन बोलले असते.

यासंबंधीचा कुठला प्रस्ताव आल्यास आपली भूमिका काय असेल, असे विचारल्यावर शिंदे म्हणाले, मला तशी कुठली विचारणाच झाली नसल्यामुळे मी त्यावर कसे काय बोलू शकतो? हा काल्पनिक स्वरूपाचा प्रश्नम आहे. अर्थात, मी महाराष्ट्राचा आहे. मी जन्मलो आणि वाढलोही महाराष्ट्रातच. तिथेच माझी कारकीर्द घडली. महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमानच आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

Leave a Comment