अंधश्रध्दा कधी कमी होणार?

मुळात परमेश्‍वर नावाची शक्ती अदृश्य आहे. तिची भक्ती ही अमूर्त गोष्ट आहे. त्या अमूर्त भक्तीतून कोणतीही मूर्त गोष्ट तयार होऊ शकत नाही. म्हणूनच सत्य साईबाबा कितीही ग्रेट असले तरी त्यांच्या बगलेतून सोन्याच्या अंगठ्या पडत असतात ही गोष्ट हातचलाखीचीच होती. परमेश्‍वराच्या कृपेने किंवा भक्तीने वस्तू तयार होत नाहीत. भक्ती ही भावना आहे. ती मनाला चेतना देऊ शकते आणि त्या मनामुळे प्रेरित झालेला माणूस काही करू शकतो. ही गोष्ट खरी आहे. परंतु प्रत्यक्षात भक्तीमुळे काही निर्माण होत नसते. परंतु अंधश्रध्दांवर जगणारे लोक वाटेल त्या गोष्टी करून देवालाही बदनाम करतात आणि आपल्याही आयुष्याचे वाटोळे करून घेतात. पुणे जिल्ह्याच्या चाकण परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने पैशाचा पाऊस पडावा म्हणून आपल्या मित्राचा आणि त्याच्या आईचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार परमेश्‍वर विषयक अंधश्रध्देतून निर्माण झालेला आहे. एका स्त्रीचा आणि तिच्या मुलाचा असे दोघांचे खून लागोपाठ गळा चिरून केले तर डोक्यावर पैशाचा पाऊस पडेल अशा अपेक्षेने या सुशिक्षित तरुणाने आपल्या मित्राचा असा घात केला. या दुहेरी खून प्रकरणातील काही तपशील तर डोके चक्रावून टाकणारे आहे.

विलास पाचंगे हे या आरोपीचे नाव. वरकरणी तरी या नराधमाने आपल्या मित्राला त्याच्या आईचा खून करण्यास मदत करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु तो तसा खून करणारच नव्हता. तो आईचा तर खून करणार होताच पण त्याने आपल्या मित्राचाही बळी द्यायचे ठरवले होते. अशा रितीने त्याचा मित्रच पैशाच्या पावसासाठी आवश्यक अशा दोन बळींची व्यवस्था करत होता. विलास पाचंगेने आपल्या मित्राला आणि आईला घेऊन दाट वनराई गाठली आणि तिथे आईला एकेठिकाणी बसवून आपल्या मित्राला लोणावळ्याच्या दाट झाडीत नेऊन मारून टाकले. आईला मात्र वेगळेच कारण सांगून त्याने गावाकडे परत आणले आणि दोन दिवसांनी तिलासुध्दा एका देवालयात नेले आणि ती बेसावध असताना तिचा गळा चिरून खून केला. अशा या दोन खुनांचा तपास लागणे मुश्किल होऊन बसले होते. परंतु मृत तरुणाचा एकुलता एक मित्र म्हणून विलास पाचंगेची चौकशी केली आणि सारीच कहाणी उघड झाली. या एकविसाव्या शतकामध्ये एखाद्याचा खून केल्यास पैशाचा पाऊस पडतो अशी कल्पना घेऊन कोणीतरी जगू शकते ही गोष्टच मनाला विलक्षण धक्का देणारी आहे. पैसा म्हणजे नोटा. त्या तयार करायच्या असतील तर कागद लागतो, छपाई मशीन लागते आणि तिच्यात नोटा छापल्य जात असतात.

त्यांची छपाई विलक्षण गुंतागुंतीची असते. तिच्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या घटना किंवा प्रक्रिया एका व्यक्तीच्या हत्येने आपोआप कशा घडू शकत असतील. याचा अगदी कॉमन सेन्सने विचार केला तरी हे शक्य नाही हे लक्षात येते. अशा गोष्टींवर लोकांनी विश्‍वास ठेवू नये, सारासार विवेक बुध्दीचा विचार करावा या गोष्टी शिक्षणाने साध्य होत असतात. असे समजले जाते. परंतु कोणाचा तरी जीव घेण्याचा आणि नोटांचा काही संबंध नाही. ही गोष्ट कळायला शिक्षण तरी कशाला पाहिजे? असा पैशाचा पाऊस देवाच्या कृपेने पडतो असा या तरुणाचा समज होता आणि त्यासाठी हत्या करताना ११ वेळा एक मंत्र म्हणावा असे त्याला एका मांत्रिकाने सांगितले होते. मुळात बळी देणारा आणि बळी जाणारा असे दोघेही एकाच देवाची मुले आहेत. आपल्या व्यवहारातल्या उदाहरणावरून या गोष्टीचा विचार करू. एखादी स्त्री आहे. तिला दोन मुले आहेत असे गृहित धरा. त्यातल्या एका मुलाला खूप पैसा हवा आहे. कष्ट न करता तो मिळावा असे त्याला वाटते. त्यासाठी तो आईसमोर हट्ट धरतो. परंतु कोणतीही समंजस आई आपल्या मुलाला असा ईझी मनी मिळवण्यापासून परावृत्तच करील. कोणतीही आई पैशाचा हव्यास असणार्‍या मुलाला, आपल्या दुसर्‍या मुलाचा बळी दिला तर प्रसन्न होऊन आपण पैशाचा पाऊस पाडू असे म्हणणार नाही. ते कदापिही शक्य नाही. देवसुध्दा आईसारखाच असतो. आपल्या एका अपत्याचा बळी दिल्याने तो खूष होत नाही. उलट तो नाराज होतो. मग त्या ११ मंत्रांमध्ये असे काय आहे की ज्यामुळे देवालाच आपल्या अपत्याचा बळी हवासा वाटतो. साध्या तर्काने जरी आपण विचार केला तर असा पैशाचा पाऊस शक्य नाही हे लक्षात येऊ शकते. परंतु कष्ट करून पैसा कमविण्याची प्रवृत्ती कमी होत चालली आहे आणि अशा अंधश्रध्दांना बळी पडून लोक वाट्टेल ते करून कष्टाविना पैसा मिळविण्यास हपापल्यासारखे वागायला लागले आहेत. एकंदरीत स्थिती चिंताजनक आहे. अशा प्रकारच्या अंधश्रध्दा शिक्षणाच्या प्रमाणात कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने अशा अंधश्रध्दांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची तरतूद असलेला कायदा करायला घेतला आहे. संबंधित विधेयकसुध्दा तयार आहे. परंतु समाजात अंधश्रध्दांचाच प्रचार करणार्‍या काही लोकांनी या विधेयकाला विरोध करायला सुरूवात केली आहे. अंधश्रध्दांचा बंदोबस्त करणारे कायदे आणि त्या संबंधीची जनजागृती केली नाही तर समाजात मोठा अनाचार माजेल, ही गोष्ट या विधेयक विरोधी लोकांच्या लक्षात येत नाही. सुमारे ३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या संतांनी अशा अंधश्रध्दांच्या विरोधात रान पेटविले होते. परंतु त्यांना ३०० वर्षांपूर्वी जे कळले ते आताच्या शिकलेल्या लोकांना अजूनही कळेनासे झाले आहे. समाज कुठ वहात चालला आहे कळत नाही.