सीबीआयवरुन काँग्रेस, भाजपमध्ये शाब्दिक युद्ध

नवी दिल्ली, दि. 15 – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यपद्धतीवरून आज काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. केंद्र सरकारचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसच्या निर्देशानुसार सीबीआय काम करत असल्याचा आरोप भाजपने केला, तर सीबीआयबाबत भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सीबीआयने कालच भाजपचे नेते आणि राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घडामोडीवरून भाजप संतप्त झाला आहे. या पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आज कटारिया यांच्यावरील आरोप फेटाळले. पक्ष कटारिया यांच्या पाठीशी आहे. सीबीआय आणि काँग्रेसकडून करण्यात येणार्‍या प्रयत्नांचा पर्दाफाश आम्ही कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या करू, असे ते म्हणाले. तर, माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्याविरोधात शंभरपट अधिक पुरावे असूनही सीबीआयने त्यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केला. भाजपच्या नेत्यांना गोवण्यासाठी काँग्रेसच्या निर्देशानुसार सीबीआय पावले टाकत असल्याचा आरोप या पक्षाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सीबीआयबाबत भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते शकिल अहमद म्हणाले, माजी रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला अटक केल्यावर भाजपकडून सीबीआयची पाठ थोपटली जाते. मात्र, भाजपच्या नेत्यांविरोधात पावले उचलल्यावर तो पक्ष सीबीआयवर टीका सुरू करतो.