प्रतापगड, दि. १६ – कुंडा जिल्ह्याचे डीएसपी झिया उल हक यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने उत्तरप्रदेशचे माजी मंत्री राजा भैय्या यांची चौकशी केली. सीबीआयने प्रतापगड येथे तात्पुरत्या स्वरूपात जे कार्यालय उघडले आहे तेथे जाऊन राजा भैय्या तपास अधिकार्यांपुढे हजर राहिले. अधिकार्यांनी त्यांना डीएसपीची हत्या तसेच कुंडाच्या सरपंचांच्या हत्या प्रकरणात काही प्रश्नव विचारले.
पोलिसांनी या हत्या प्रकरणात राजा भैय्यांशी संबंधीत असलेल्या काही लोकांना या आधीच अटक केली आहे. त्यात त्याच्या भुल्ले पाल नावाच्या एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. राजा भैय्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजीव सिंग आणि गुड्डु सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. दिवंगत डीएसपींच्या पत्नी परवीन आझाद यांनी राजा भैय्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तथापी डीएसपींच्या हत्येत आपला काहीच संबंध नसल्याचा दावा त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.