जिनिव्हा दि.१५ – मित्रांनी पुरविलेल्या शस्त्रांचा वापर सुरक्षा रक्षक आणि अन्य कैद्यांना दाखवून स्वीस तुरूंगातील पाच अट्टल हिरेचोरांनी तुरूंगातून यशस्वी रित्या पलायन केल्याची घटना सकाळी दहाच्या सुमारास बाओस मरमेट तुरूंगात घडली. अवघ्या पाच मिनिटांत या पाच जणांनी नाट्यपूर्ण पलायन करण्यात यश मिळविले मात्र त्यांचा सहावा साथीदार रक्षकांच्या ताब्यात सापडला असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार हे पाच जण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाँटेड गुन्हेगार आहेत. पिंक पँथरच्या गँगमधील हे गुन्हेगार असून त्यातील एक फ्रेंच, एक अल्बानियन, एक बोस्नियन, एक केसोव्हर आणि एक सर्बियन आहे. सकाळी हे कैदी तुरूंगात त्यांच्या फेन्सच्या आत जमा झाले असताना बाहेरच्या बाजूने तुरूंगाच्या भिंतीला शिडी लावून आलेल्या त्यांच्या कांही मित्रांनी शस्त्रांनी भरलेली बॅग भिंतीच्या आत टाकली. या पाच जणांनी त्वरीत ती ताब्यात घेऊन त्यातील शस्त्रांचा धाक अन्य ३० कैदी व सुरक्षा रक्षकांना दाखवून फेन्सची वायर कापली आणि मित्रांनीच लावलेल्या शिडीवरून तुरूंगाची भिंत चढून बाहेर पोबारा केला. अवघ्या पाच मिनिटांत हे सारे नाट्य घडले. मात्र त्यांचा सहावा साथीदार भिंतीवर चढत असतानाच रक्षकांनी त्याला पकडले..
या कैद्यांनी शस्त्रांचा धाक दाखवितानाच उग्र वासाचा स्प्रे ही रक्षकांवर उडविला होता असेही सांगण्यात येत आहे. या पाचही कैद्यांचा शोध सुरू झाला असून हे पाचजण त्यांच्या मित्रांनी आणलेल्या दोन वाहनांतून पळून गेले आहेत.