लोकप्रियतेचे प्रदर्शन करण्यासाठी लालूंचा आटापिटा

पाटणा, दि.१५ -सध्या केंद्रीय आणि बिहारच्या राजकारणात अडगळीत पडलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी लोकप्रियतेचे प्रदर्शन करण्यासाठी आटापिटा चालवला आहे. त्यातूनच राजदच्या वतीने आज येथे आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन रॅलीसाठी तब्बल १३ रेल्वेगाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच लालूंची मुलेही या रॅलीत सहभागी होणार आहेत.

परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन घडवण्याचा चंग राजदने बांधला आहे. त्यामुळे या रॅलीसाठी अधिकाधिक गर्दी जमवण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातूनच १३ रेल्वेगाड्या आरक्षित करण्यासाठी या पक्षाने तब्बल १.११ कोटी रुपये मोजले आहेत. बिहार आणि झारखंडमधील विविध ठिकाणांहून या रेल्वेगाड्या पाटण्यात दाखल होतील.

लालू २००५ पासून बिहारच्या सत्तेपासून दूर आहेत. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांतही राजदला नगण्य जागा मिळाल्यामुळे लालूंना केंद्रीय राजकारणातही फारसे महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळेच पुढील वर्षी होणार्याा लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून लालूंनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे. अर्थात, उद्याच्या रॅलीत प्रामुख्याने बिहारमधील नितीशकुमार सरकारच्या विरोधातच लालू रणशिंग फुंकणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Comment