येरवडा तुरूंगात लवकरच कैद्यांसाठी फोन सुविधा

पुणे दि.१५- बॉलिवूड अभिनेता आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झालेला संजय दत्त गुरूवारी टाडा न्यायालयासमोर शरण येणार असल्याचे आता नक्की झाले असतानाच त्याला शिक्षा भोगण्यासाठी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पाठविले जाईल असेही सांगितले जात आहे. येरवडा तुरूंगात आल्यास संजयला आपले कुटुंबिय आणि वकील यांच्याशी फोनवरून संभाषण करण्याची सुविधा मिळू शकणार आहे कारण येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी लवकरच फोन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार गेल्याच वर्षी राज्य कारागृह विभागाने गृह विभागाकडे राज्यातील ५६ तुरूंगातून कैद्यांसाठी फोन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला गृहमंत्रालयाने मंजुरी दिली असून ही सेवा राज्यात सर्वप्रथम येरवडा कारागृहात ट्रायल बेसिसवर सुरू केली जात आहे. त्यामुळे शिक्षा भोगणारे कैदी आणि कच्च्या कैदेतील कैदी महिन्यातून दोन वेळा आपले नातेवाईक अथवा वकीलांशी संपर्क साधू शकणार आहेत. दिल्लीच्या तिहार तुरूंगात ही सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.

अतिरिक्त तुरूंग महासंचालक मीरा बोरवणकर यासंदर्भात बोलताना म्हणाल्या की फोन सेवा पुरवठादार यांच्याशी करार झाल्यानंतर ही सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी कैद्यांना प्रथम कांही रक्कम तुरूंग कार्यालयात जमा करावी लागणार आहे तसेच त्यांच्या दोन नातेवाईकांचे फोन नंबर द्यावे लागणार आहेत. या नंबरची खात्री पोलिस करून घेणार आहेत. कैदी जे संभाषण करतील त्यावर सीसीटिव्ही द्वारा नजर ठेवली जाणार आहे.

तुरूंगातील अन्य एका अधिकार्‍याने संजय दत्त याला याच तुरूंगात पाठविले जाईल अशी शक्यता वर्तविली असून येरवडा तुरूंगात अशा हाय प्रोफाईल कैद्यांसाठी सुरक्षा व्यवस्था पुरेशी असल्याचेही सांगितले. ते म्हणाले की इंडियन मुजाहिद्नीनचा सिद्दीकी याचा या तुरूंगात खून झाल्यापासून येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. फोन सुविधा दिल्यानंतर कैद्यांच्या भेटीला येणार्याद नातेवाईकांची संख्याही कमी होईल आणि परिणामी सुरक्षा यंत्रणांवरचा ताणही कमी होणार आहे.

Leave a Comment