मान्सूनचे आगमन लवकरच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बंगालच्या उपसागरात घोंघावणा-या ‘ महासेन ‘ वादळाच्या वा-यांचे बळ नैऋत्य मोसमी वा-यांना मिळाले असून, येत्या दोन तीन दिवसांतच अंदमान बेटांवर मान्सूनच्या पहिल्या सरी बरसण्याची शक्यता आहे. अंदमान बेटांवर मान्सूनचे आगमन झाल्याने शेतक-यात समाधानाचे वातावरण आहे.

भारतामध्ये गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले होते. त्यामुळे मान्सूनच्या येण्याच्या वर्दीने शेतक-यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरवर्षी साधारणपणे १० ते २० मेच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होते . यंदा मात्र बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या ताशी ७५ किमीच्या वेगाने पुढे सरकरणा-या महासेन वादळामुळे येथे आताच जोरदार पाऊस सुरू आहे व तो लवकरच ओडिसा व इतर किनारी भागांना धडकण्याच्या तयारीत आहे. याच वा-यांमुळे देशात मान्सूनचे आगमन लवकर होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे .

हवामान खात्याने गेल्याच महिन्यात केलेल्या भाकितानुसार यंदाच्या वर्षी मान्सून समाधानकारक असेल असे आणि ९८ टक्के पाऊस होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे मान्सूनच्या येण्याच्या वर्दीने शेतक-यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे .