सुईविना इंजेक्शन

नवी दिल्ली दि.१५ – भारतीय विज्ञान संशोधन संस्थेनेच्या वैज्ञानिकांनी पेनाच्या आकाराचे मात्र सुईच्या वापराशिवायच शरीरात औषध टोचू शकणारे उपकरण तयार करण्यात यश मिळविले असून त्याच्या प्राथमिक चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे या पुढे रूग्णांना कोणत्याही वेदना न होता आणि कुठेही या उपकरणाच्या सहाय्याने औषध शरीरात टोचणे शक्य होणार आहे.

या उपकरणात सुपरसॉनिक शॉक लहरींचा वापर करण्यात आला आहे. सुपरसॉनिक शॉक लहरींचा वापर करून असे उपकरण जगात प्रथमच तयार केले गेले आहे. त्यासाठी भारतीय विज्ञान संशोधन संस्था, मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी आणि एरोस्पेस इंजिनिअरींग यांचे संयुक्त प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. या उपकरणाच्या सहाय्याने उंदरांच्या शरीरात टायफॉर्सडची लस यशस्वी पणे टोचली गेली आहे असे या संस्थेतील संशोधकांचे म्हणणे आहे.

या उपकरणाचे अनेक फायदे आहेत. प्रत्यक्ष सुईचा वापर करावा लागत नसल्याने सुईमधून रूग्णाला इन्फेक्शन होण्याचा धोका राहात नाही. तसेच वेदना होत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे उपकरण कुठेही नेणे सोयीचे आणि सहजशक्य आहे असाही वैज्ञानिकांचा दावा आहे. आणखी काही काळ यावर चाचण्या केल्या जाणार असून नंतर ते प्रत्यक्ष उपयोगात आणले जाईल असेही सांगण्यात आले आहे.