युवराज सिंग फौंडेशनतर्फे कर्करोग चिकित्सा केंद्रे

रांची दि.१५ – लोकप्रिय क्रिकेटपटू आणि कर्करोगाशी यशस्वी मुकाबला केलेला युवराज सिंग याने रांची येथे दोन कर्करोग चिकित्सा केंद्रे सुरू केली असून त्याच्या -यू वुई कॅन- या फौंडेशनतर्फे ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी कोलकता येथील अपोलो कॅन्सर हॉस्पिटलचे सहकार्य घेण्यात आले आहे. येथे कर्करोगाची मोफत चाचणी केली जाणार असून लोकांत या रोगाबद्दल जागृती व्हावी आणि या रोगाचे निदान प्राथमिक अवस्थेतच केले जावे असा यामागे उद्देश आहे.

या वेळी बोलताना युवराज म्हणाला की वर्ल्ड कप टीमचा सदस्य ते आयुष्यासाठी झगडा देणारा रोगी असा माझा प्रवास झाला आहे. आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले आणि अनुभवले आहेत. मात्र आमच्या फौंडेशनच्या नावानुसार मी सांगू इच्छितो की तुम्ही मी आणि आपण सर्वजणच कर्करोगाशी यशस्वी मुकाबला करू शकतो. कर्करोग रूग्णांच्या वेदना, दुःख आणि अडचणींचा मला अनुभव आहे. म्हणूनच प्राथमिक अवस्थेत या रोगाचे निदान व्हावे यासाठी ही निदान केंद्रे सुरू केली आहेत.

अपोलो ग्लेनइगल्स कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. रूपाली बसू म्हणाल्या की कॅन्सर लवकर निदान झाले तर पूर्ण बरा होतो ही जागृती लोकांमध्ये व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.  सिंग फौंडेशनने  दिलेल्या कॅन्सर मोबाईल युनिटच्या सहाय्याने आत्तापर्यंत ७५५ महिलांमध्ये सर्व्हीकल कर्करोगाचे निदान करण्यात आले आहे. या निदान केंद्रातून १ लाख लोकाची तपासणी वर्षात करण्याचे ध्येय ठरविले गेले असून लवकरच पूर्व भारतात अशी आणखी कांही केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

Leave a Comment