मुंबई- सनरायझर्स हैदराबादने दिलेले टार्गेट पार करताना मुंबई इंडियन्सची दमछाक झाली होती. मात्र विजयासाठी ४० चेंडूंत ८० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी आक्रमक फलंदाज असलेला कायरॉन पोलार्ड मैदानात आला आणि त्याने दमदार फलंदाजीच्या जोरावर सामन्याचे चित्रच बदलून टाकले. तो येण्यापूर्वी सामना आम्ही खिशात टाकला होता. ही लढत आमच्याच हातामध्ये होती. पण पोलार्डने २७ चेंडूत ६६ धावा करून सामन्याचे पारडे मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकवले, असे मत सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक टॉम मूडीने व्यक्त केले.
या बाबत अधिक बोलताना सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक टॉम मूडी म्हणाला, ‘ तसे पहिले तर या स्पर्धेत आमच्या फलंदाजांना प्रतिभेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजांनी टीकाकारांची तोंडे बंद केली. मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर एकही लढत गमावली नव्हती. याही लढतीत त्यांनी सरस खेळ केला. थिसारा परेरा किंवा अमित मिश्रा यांची षटके आमच्यासाठी हानीकारक ठरली. त्यामुळे आम्हला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.’
पुणे वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत ताप असल्यामुळे पोलार्डला संघाबाहेर रहावे लागले होते. त्यामुळे आजारी असूनही पोलार्ड मैदानात उतरला. आणि त्याने मुंबई इंडियन्सला या सामन्यात एक हाती विजय मिळवून दिला.