वैमानिक रहित विमानाचे उड्डाण यशस्वी

लंडन दि.१४ -वैमानिक रहित विमानाचे पहिले वहिले उड्डाण ब्रिटीश एअरस्पेसमध्ये यशस्वी रित्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. बीएई जेटस्टीम एक्झिक्युटिव्ह क्राफ्ट या विमानाने लॅन्सेशायर मधील वारटन पासून स्कॉटलंडमधील इनव्हेरनेस हा ३०० मैलाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

अर्थात या विमानाचे टेकऑफ आणि लँडींग करण्यासाठी दोन पायलट विमानात उपस्थित होते मात्र बाकी मार्गावर विमानाचे नियंत्रण जमिनीवर असलेल्या पायलटने संगणकाच्या सहाय्याने केले. वीस हजार फुटांवरून या विमानाने जमिनीवरील पायलटच्या सूचनांनुसार प्रवास केला. या प्रकल्पासाठी ६२ दशलक्ष पौंडांचा निधी देण्यात आला असून पहिल्या यशस्वी चाचणीमुळे विश्वास वाढल्याचे प्रकल्पातील अधिकार्‍यांनी सांगितले.

पुढील पाच वर्षात अशा प्रकारच्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर वैमानिकाविना विमान चालविणे प्रत्यक्षात येईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment