मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता : मान्सून आंदमानात दाखल

पुणे, दि.14 (प्रतिनिधी)- बंगालच्या उपसागरात सक्रीय असलेल्या महासेन चक्रिवादळाची दिशा बदलली आहे. वारे आग्नेय दिशेकडून नैऋत्येकडे वाहत आहेत.चेन्नईपासून आग्नेय दिशेला 690किलोमिटर अंतरावर सक्रीय असलेल्या महासेन चक्रिवादळामुळे नैऋत्य मोसमी वारे आंदमानमध्ये साधारण दोन ते तीन दिवसात दाखल होणाचा अंदाज हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान सोमवारी या भागात दमदार पावसाने हजेरी लावली.
बंगालच्या उपसागरात ‘महासेन‘ सक्रिय झाल्याने हिंदी महासागरातल्या हवामानात मोठा बदल झाला आहे. विषुवृत्ताकडुन वाहणारे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत आहे.यामुळे या भागात आद्रता वाढली आहे.चक्रिवादळ समुद्रात जेवढे जास्त काळ टिकेल तेवढी मदत मान्सून आंदमानात स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

महासेन’ चक्रीवादळाचा प्रभाव कायम असल्याने दक्षिण अंदमान समुद्र व लगतच्या बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास पुढील दोन दिवस अनूकूल स्थिती असेल असा हवामान खात्याचा अंदाज होता, मात्र सध्या अंदमान निकोबारसह उपसागरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे, परंतु काही घटकांचे निकष न जुळल्याने मान्सूनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सोमवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील उष्णतेची लाट ओसरली. चंद्रपूर येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. उर्वरित विदर्भात कमाल तापमानाचा पारा 41 ते 43 अंशांदरम्यान होता. विदर्भात एक-दोन ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली. हवामान खात्याने मंगळवारी सकाळपर्यंत विदर्भात एक-दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकणात आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा अंदाज आहे. हा चक्रावात पूर्वेला चीनकडे सरकल्यानंतर विदर्भासह मध्य भारतात कमाल तापमानात पुन्हा दोन ते चार अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज आहे.
.

Leave a Comment