मुंबई मेट्रोवर दोन महिला पायलट

मुंबई दि.१४ – महाराष्ट्रदिनी म्हणजे १ मे रोजी मुंबईत पहिली मेट्रो धावली आणि मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिली महिला रेल्वे चालक येण्यासाठी तब्बल १२५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती मात्र मेट्रोने ही किमया सुरवातीलाच करून दाखविली आहे. मेट्रो पायलट म्हणून भरती करण्यात येणार्यान ४० जणांत दोन महिलांनीही आपले स्थान नक्की केले आहे. ८० दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तब्बल ४० कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत असे समजते.

या प्रशिक्षणार्थी पायलटना केवळ मेट्रो चालविण्याचेच शिक्षण दिले जात नसून त्यांना आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्यातून मार्ग काढण्यासाठीही सज्ज केले जात आहे. दहशतवादी हल्ला, वैद्यकीय आणीबाणीत काय करायचे याचेही ज्ञान त्यांना दिले जात आहे. सहा हजार इच्छुक उमेदवारांतून केवळ ४० जणांची निवड या प्रशिक्षणासाठी झाली आहे आणि त्यात प्रियांका बालिट आणि श्रीकला नायर या दोघीजणींनी स्थान मिळविले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर या ११.०७ किमी अंतराच्या प्रवासास सुरवात करतील.

प्रियांका अभियांत्रिकी पदवीधर आहे. ती सांगते, हे प्रशिक्षण सोपे नाही तर ते हार्ड वर्क आहे मात्र त्यात खरच मजा आहे. प्रशिक्षणातील प्रत्येक टप्प्यानंतर प्रशिक्षणार्थीचे लेखी व प्रात्यक्षिक परिक्षाद्वारे मूल्यांकन केले जाते. निवड होतानाही अनेक कडक चाचण्या पार कराव्या लागल्या आहेतच. देशात तसेच परदेशात प्रशिक्षण घेतलेल्या अनुभवी शिक्षकांकडूनच हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्या दरम्यान चीनमधील नागजिग व सेऊल येथे मेट्रो चालविण्याचा अनुभवही घेता आला आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम रिकामी ट्रेन चालवून दाखवावी लागेल व त्यानंतरच त्यांना सर्टीफिकेट दिले जाईल असे प्रशिक्षक सांगतात. पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रिफ्रेशर कोर्स दिला जाणार आहे. मेट्रो पायलट म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांना ५० ते ७० हजार रूपये दर महिना पगार मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment