मुंबई, ठाणे आणि नव्या मुंबईत घरे महाग

मुंबई दि.१४ -गेल्या चार वर्षात मुंबईतील घरांच्या किमतीत सरासरी ६६ टकके वाढ झाली आहे तर मुंबईजवळच्या ठाणे आणि नवी मुंबई येथे ही वाढ अनुक्रमे ७० व ७४ टक्के असल्याचे बांधकाम सल्लागार संस्था जोन्स लँग लासेल यांनी आपल्या अहवालात नमद केले आहे. विशेष म्हणजे भारतातील मोठ्या शहरांच्या तुलनेत या तीन शहरांतल्या घरांच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश नायर या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की या तीन शहरात घरांना सतत असलेली मागणी, बांधकाम दरात झालेली वाढ, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, वाढलेले व्याजदर ही घरांच्या किमती वाढण्यामागील अनेक कारणांतील मुख्य कारणे आहेत. मुंबईच्या तुलनेत गजबजलेल्या बंगलोर आणि गुरगांव या शहरात ही वाढ अनुक्रमे ५२ व ४६ टक्के आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात निवासी जागांत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढते आहे मात्र या भागात क्लिअर टायटल जमिनींची उपलब्धता कमी आहे. परिणामी घरांच्या किमती कमी होण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे नवीन घरे घेऊ पाहणार्याी ग्राहकांना सध्या तरी घरांच्या किमती कमी होतील असा दिलासा देण्यात कांही अर्थ नाही असेही नायर यांनी सांगितले.

Leave a Comment