किरॉन पॉलार्डची आतिषबाजी, मुंबईचा विजय

मुंबई, दि.१४ – घरच्या मैदानावर आम्हीच राजे हे पुन्हा एकदा सिद्ध करत मुंबई इंडियन्सने हैदराबाद सनरायझर्सवर सात गडी राखून विजय मिळवला.  हैदराबाद सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करत मुंबईपुढे विजयासाटी १७९ धावांचे आव्हान दिले होते.  मुंबईने हे लक्ष्य तीन चेंडू राखून आणि सात गड्यांच्या मोबदल्यात पार केले. केवळ २७ चेंडूत ६६ धावा करणारा किरॉन पोलार्ड मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात चेन्नईला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तसेच अंतिम चार संघामधील आपली दावेदारी मजबूत केली आहे.

त्याआधी हैदराबाद सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या लसित मलिंगाने पार्थिव पटेलला २६ धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर धवन आणि हनुमान यांनी दुस-या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. धवन ५९ धावांवर बाद झाला. त्याला मिचेल जॉन्सनने बाद केले. अखेरच्या काही षटकांत हनुमान आणि कॅमरुन व्हॅइट यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादला १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.

विजयासाठी १७९ धावांची आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सलामीच्या जोडीला पुन्हा एकदा दमदार सुरुवात करण्यात अपयश आले. ड्वेन स्मिथ केवळ २१ धावा करुन बाद झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिक यांनी दुस-या विकेटसाठी धावांची भागीदारी केली. ही जोडी मुंबईला विजय मिळवून देईल असेल वाटत असतानाच सचिन दुखापतीमुळे माघारी परतला.त्याच्या बदली आलेला कर्णधार रोहित शर्मा २० धावा काढून बाद झाला.

तीन बाद ९९ अशा बिकट स्थितीत किरॉन पॉलार्डने सामन्याचे चित्रच बदलले. त्याने मुंबईला २४ चेंडूत ६२ धावांची गरज असताना परेराच्या एका षटकात तब्बल ३३ धावा लुटल्या. त्यानंतरच्या षटकात पॉलार्डने अमित मिश्राला आपले लक्ष्य बनवले. १८व्या षटकात त्याने २१ धावा काढल्या. अखेरच्या षटकात सात धावांची गरज असताना त्याने सलग दोन षटकार ठोकत मुंबईला दणदणीत विजय मिळवून दिला. पॉलार्डच्या तुफानी खेळीत आठ षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.