सोने, वाहन खरेदीसाठी होणार आज गर्दी

मुंबई – गेल्या चार दिवसापासून ‘ एलबीटी ‘ला विरोध करण्यासाठी व्याप-यांनी बेमुदत बंद ठेवला होता. मुंबईतील व्याप-यांनी मात्र सोमवारी सोन्या-चांदीचे व अन्य बाजारपेठ अक्षय तृतीयेला खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने व वाहन खरेदीसाठी मध्यमवर्गीय ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या लगीनघाई सुरु असल्याने या शुभमुहूर्तावर सोनेखरेदी करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव उतरल्यानेही यंदा सोनेविक्री चाळीस टक्क्यांनी वाढू शकेल, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तवला आहे .

गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव उतरला आहे. बाजारपेठेत दहा ग्रॅम सोन्याचा भाव ३१ हजारांहून २६ हजारांपर्यंत गडगडला , हा दर आणखी खाली येण्याची शक्यता होती . त्यामुळे गुढीपाडव्याला ग्राहकांनी सकाळपासून सोन्याच्या पेढीवर रांगा लावल्या होत्या. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या भावात आठ टक्के वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा भाव घाऊक बाजारात २७ , १६० रुपये झाला . मात्र , गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला सोने ३२ हजार रुपयांहून अधिक दराने विकले गेले होते . त्या तुलनेत यंदा सोने स्वस्त झाल्याने सोन्याची विक्री वाढण्याची शक्यता आहे .

अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत शेअर बाजारमध्येही ‘ गोल्ड इटीएफ ‘ च्या व्यवहारासाठी अधिक वेळ दिला जाईल. गेला आठवडाभर ठप्प झालेली खरेदीविक्री आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त यामुळे ग्राहक सोने व वाहन खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment