महायुतीच्या सत्ता वाटपाचा लेखी करार व्हावा – रामदास आठवले

मुंबई, दि.१३ – राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे, पण त्यापूर्वी जागा वाटपाच्या वेळीच सत्ता वाटपाचा लेखी करार केला जावा आणि रिपाइंला उपमुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.

आठवले म्हणाले, बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष उभारण्यात अपयश आल्याची खंत आहे. आंबेडकर आणि इतर गट एकत्र आले असते, तर सत्तेत 30 टक्के वाटा मिळाला असता, पण असे झाले नाही. रिपब्लिकन नेत्यांची ही ऐतिहासिक चूक असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच शिर्डीत आपल्याला जाणीवपूर्वक हरवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

आजपर्यंत ऐक्याचे अनेक प्रयोग फसले आहेत. ऐक्यासाठी आपण तयार आहोत, पण चार दोन बौद्ध नेत्यांच्या ऐक्यापेक्षा दलितेतर समाज जोडणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.

Leave a Comment