इस्त्रायलने ड्रोन विमानांचा वापर थांबविला

जेरूसलेम दि.१३ – अतिउंचावरून गस्त घालणार्याा ड्रोन विमानांचा ताफा इस्त्रायलच्या लष्कराने सध्यापुरता जमिनीवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिटेरिनियन सम्रुद्रात एक ड्रोन विमान कोसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. अर्थात हे विमान इस्त्रायलने मुद्दामच समुद्रात पाडल्याचा दावाही करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या मानवरहित विमानाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने ही विमाने सध्या न वापरण्याचे इस्त्रायलने ठरविले असल्याचे लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

अशी किती विमाने वापरातून रद्द केली गेली आहेत या विषयी माहिती मिळू शकलेली नसली तरी विमान समुद्रात कोसळण्याच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असल्याचेही सांगितले जात आहे. इस्त्रायलनेच तयार केलेले हेरॉन १ हे ड्रोन विमान अतिउंचावरून उडू शकते तसेच तब्बल ४५ तास हवेत राहू शकते.

गेल्या वर्षातच हेरॉन टीपी हे मोठे ड्रोन विमान उड्डाण करतानाच कोसळले होते. विशेष म्हणजे ड्रोन तंत्रज्ञानात इस्त्रायल जगात प्रथम क्रमांकावर आहे. पॅलेस्टीनींनी इस्त्रायल ड्रोनचा वापर मिसाईल डागण्यासाठी करत असल्याचे आरोप वारंवार केले असून इस्त्रायलने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.