महात्मा गांधी यांनी आपल्या आत्मचरित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे शीर्षक दिलेले आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अहिंसात्मक मार्गाने सत्याचा आग्रह कसा धरावा आणि आपले सत्य म्हणणे लोकांच्या गळी कसे उतरवावे यासाठी म्हणून सत्याग्रहाचा मार्ग शोधून काढला होता आणि आपल्याला एखादी गोष्ट सत्य म्हणून पटली असेल तर ती सांगण्यासाठी आणि लोकांना पटवण्यासाठी स्वत: आत्मक्लेश कसे करून घ्यावेत, हे त्यांनी दाखवून दिले होते. सध्या महाराष्ट्रामध्ये एलबीटीच्या विरोधात व्यापारी संघटनांनी बंदचा मार्ग स्वीकारला आहे. खरे म्हणजे बंद हा स्वत:च्या मनाला त्रास करून घेण्यासाठी पाळायचा असतो. परंतु व्यापारी संघटनांचे सदस्य असलेले दुकानदार आत्मक्लेशासाठी दुकाने बंद ठेवायला तयार आहेत का? ही दुकाने आत्मक्लेशासाठीच बंद ठेवायची आहेत याची जाणीव त्यांना आहे का? की त्यांचा काही वेगळा विचार आहे? महात्मा गांधी यांचे निधन होऊन बरीच वर्षे झाली आहेत. अहिंसा, हरताळ, सत्याग्रह, अहिंसात्मक आंदोलने आदी त्यांनी पुरस्कारिलेल्या मार्गांच्या बाबतीत बर्याच गफलती निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे मूळ तत्त्वज्ञान विसरले गेले आहे.
असत्याचे प्रयोग
अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या व्यापारी संघटना एलबीटी कराच्या बाबतीतील आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरविण्यासाठी गांधीप्रणित मार्गाचा अवलंब करणार असतील तर त्यांनी तो जरूर करून दाखवावा आणि याच मार्गांनी सरकारला एलबीटी कर रद्द करण्यास भाग पाडावे. एक प्रयोग म्हणून हे करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या विस्मरण होत असलेल्या तत्त्वज्ञानाला चांगलाच उजाळा तरी मिळेल आणि या व्यापार्यांना जगणे मुश्कील करून सोडणारा हा एलबीटीचा प्रश्न तरी सुटेल. आपण जे म्हणत आहोत ते सत्य आहे, पण ते राज्यकर्त्यांना पटत नाही. तेव्हा त्या सत्याच्या आग्रहासाठी आपणच क्लेश सहन करावेत, म्हणजे राज्यकर्त्यांना ते सत्य पटेल. अशी ही सत्याग्रहाची कल्पना होती. दुसरा मार्ग म्हणजे हरताळ. हा शब्द आता आपल्या भाषेतून हद्दपार झाला आहे. परंतु महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानात त्याला फार महत्व आहे. आपले म्हणणे सरकारला पटत नसेल तर आपण आपली दुकाने एक दिवस बंद ठेवावीत. उपोषण करावे, सरकारी कार्यालयासमोर निदर्शने करावीत, धरणे धरावे, मुंडण करून घ्यावे, संप करावा, काम बंद ठेवावे अशा मार्गांनीही आपला सत्य विचार सरकारच्या गळी उतरवता येतो.
हे सुद्धा सर्व मार्ग आत्मक्लेशाचे आहेत. परंतु या तत्त्वज्ञानामध्ये आपले म्हणणे सत्य आहे हे स्वत:ला पटलेले असणे आवश्यक आहे. पण एका असत्य गोष्टीसाठी कोणी असे आत्मक्लेश करायला लागला तर त्या आत्मक्लेशाची आणि सत्याग्रहाच्या मार्गाची कुचेष्टा झाल्याशिवाय रहात नाही. महाराष्ट्रातल्या काही व्यापार्यांनी सध्या बंदचे हत्यार उपसले आहे आणि आपल्या असत्य कल्पनेसाठी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यामुळे त्यांचा हा बंद म्हणजे सत्याग्रह नसून सत्याग्रहाची कुचेष्टा आहे. आजकालच्या काळामध्ये सत्याग्रहाच्या या कल्पनेने दबाव नीतीचे रूप घेतले आहे. बंद पाळला की लोकांची गैरसोय होईल, लोक चिडतील. चिडलेले लोक सरकारवर दबाव आणतील आणि सरकारला लोकांच्या दबावासाठी का होईना पण आपला प्रश्न सोडवावा लागेल. अशा कल्पनेतून बंद पाळले जातात, रास्ता रोको केला जातो आणि असेच काही मार्ग अवलंबिले जातात. एलबीटीच्या विरोधातला बंद याही कल्पनेतून पुढे आलेला आहे. अशा बंदमध्ये लोकांची गैरसोय होणे आवश्यक असते. म्हणूनच रस्ते अडवले जातात, दुकाने बंद ठेवली जातात. परंतु लोकांची पूर्ण गैरसोय होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची ताकद दुकानदारात असली पाहिजे. त्यांना एलबीटी कर नको आहे, म्हणून त्यांनी बंद पाळला.
पण बंद पाळल्यानंतरही एलबीटी कर रद्द झालाच नाही तर काय करणार? कर रद्द होईपर्यंत दुकाने बंद ठेवणार का? असा प्रश्न विचारला तर एकही व्यापारी उत्तर देऊ शकणार नाही. मुळात त्यांनी दुकाने बंद केल्याने लोकांची फारशी गैरसोय होत नाही. काही दिवस थोडीशी गैरसोय होते, परंतु बंद ठेवणे दुकानदारांसाठीच गैरसोयीचे असते आणि त्यामुळे दुकानदारच दुकाने उघडतात. आजपर्यंत दुकानदारांचा आणि व्यापार्यांचा असा बंद कधी झालेला नाही. कोणताही व्यापारी एका असत्यासाठी आपले आर्थिक नुकसान करून घेत नाही. पण सध्या व्यापार्यांच्या संघटना आहेत आणि त्या संघटनांचे पदाधिकार्यांनी बंदची हाक दिली की दुकाने बंद होतात. एवढ्या एका गोष्टीवरून या संघटना उगाचच बंदचे नाटक करतात. सराफ व्यापार्यांनीही बंदची हाक दिलेली आहे. यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट कोणती नसेल. सोन्या-चांदीची दुकाने चार-दोन दिवसच काय पण पंधरा दिवस बंद राहिली तरी सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. त्यांची गैरसोय होत नाही. मग ही दुकाने बंद करून काय साध्य होणार आहे? या लोकांनी याचा कधी विचारच केलेला नाही. कारण त्यांना सत्याग्रह म्हणजे काय माहीत नाही.
