नवी दिल्ली दि.१३ – वेर्टू या लक्झरी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने त्यांच्या इतर स्मार्टफोन सारखाच दिसणारा वेर्टू टी आय हा लक्झरी स्मार्टफोन भारतात सादर केला असून त्याची किंमत आहे फक्त ६ लाख ४९ हजार ९९० रूपये. जगाच्या बाजारात हा फोन फेब्रुवारी २०१३ मध्येच सादर केला गेला. भारतात मात्र तो नुकताच आला आहे.
प्रथमदर्शनी कंपनीच्या अन्य स्मार्टफोनशी साधर्म्य दाखविणार्या या स्मार्टफोनची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. ड्यूएल कोअर प्रोसेसर असलेल्या या फोनची रॅम १ जीबीची आहे तर स्टोरेज क्षमता आहे तब्बल ६४ जीबी. त्याला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि त्यावर व्हिडीओ रेकॉडिगही करता येते. ३.७ इंचाचा स्क्रीन असलेला हा फोन अॅंड्रॅइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ पेरी यूस्टींग सांगतात, या फोनमध्ये १८४ पार्टस असून ते कंपनीच्या इंग्लंडमधील कर्मचार्यांनी तयार केलेले आहेत. फोनची बॉडी टिटॅनियमपासून तयार करण्यात आली असून हा फोन स्क्रॅच प्रूफ आहे. अध्यक्षांचा असाही दावा आहे की गेल्या दहा वर्षात कंपनीने जी उत्पादने बाजारात आणली त्यातील हे सर्वोत्तम उत्पादन आहे.