मोफत वृत्तपत्र देणार्‍या मुलाला काँग्रेसने घेतले दत्तक

भोपाळ, दि. १३ – कोणाचे नशीब केंव्हा आणि कसे फळफळेल हे सांगता येत नाही. एखाद्याकडे सुट्टे पैसे नसणे हेसुद्धा कसे इष्टापत्ती ठरु शकते, याचे एक सुंदरसे उदाहरण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडले आहे.

‘पेपर घ्या पेपर…’ अशी आरोळी ठोकत रोज सकाळी वर्तमानपत्रे विकणारी लहान-लहान मुले आपण नेहमी पाहतो. २५ एप्रिलची ही घटना. भोपाळमधील कौशल शाक्य नामक पेपर विकणार्याु मुलाने, राजा भोज विमानतळ मार्गावरच्या ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या एका गाडीतील प्रवाश्यांना वृत्तपत्र विकत घेण्याची विनंती केली. आत बसलेल्या ‘एका इसमाने’ कौशलकडून एक वृत्तपत्र विकत घेतले. मात्र सुट्टे पैसे ‘त्या’ ग्राहकाकडे नसल्याने, त्याने चक्क एक हजार रुपयांची नोट कौशलला दिली. पेपर विकणार्याे मुलाकडे हजार रुपये सुट्टे कुठून असणार? आणि असले तरी तीन-चार रुपयांसाठी हजाराची मोड कोण देणार.. म्हणून कौशलने ती नोट ‘त्या’ व्यक्तीला परत दिली आणि म्हटले की, ‘नोट भी रखो.. और पेपर भी ले जाओ.’

कौशलच्या या औदार्याने भारावलेल्या ‘त्या’व्यक्तीने कौशलच्या प्रामाणिकपणाची कदर केली. ‘या’ व्यक्तीने सदर मुलाचा शोध घ्यायला त्याच्या सहकारयांना सांगितले. काल ‘त्या’ व्यक्तीच्या सहकार्या नी कौशलच्या घरी भेट दिली. त्याची परिस्थिती जाणून घेतली. कौशलच्या शिक्षणासाठी त्या सर्वांनी त्याला दरमहा एक हजार रुपये शिक्षणासाठी देवू केले. एव्हढेच नव्हे तर रोजगार नसलेल्या, कौशलच्या वडीलांना, दिलीचंद शाक्य यांना एका खासगी महाविद्यालयात नोकरीही देऊ केली आहे.
कौशलने गाडीतील ‘त्या’ व्यक्तीला आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे, असे सांगितल्याने ही पुढची सगळी चक्रे हलली. कौशलचे भाग्य उजळवून टाकणारी ती व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी!

Leave a Comment