पाकिस्तानात शरिफच्या पक्षाची सत्तेकडे आगेकूच

लाहोर -पाकिस्तानाती सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या मुस्लिम लीगने आघाडी घेतली आहे. पाकमध्ये तिस-यावेळेस पुन्हा शरिफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे निश्चित झाले आहे.या निवडणुकीत शरिफ यांच्या पक्षाने १२५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.

शनिवारी पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ७० टक्के मतदान झाले होते. निवडणुकप्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी म्हणून मतदान आटोपताच मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे रात्रभर पाकिस्तानातील नागरिकांनी जागून काढली. आतापर्यंतच्या निकालांवरून शरिफ यांच्या पक्षाने बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे . दुस-या स्थानासाठी माजी क्रिकेटर इम्रान खानचा पक्ष तहरीक – ए – इन्साफ आणि सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे . दरम्यान , नवाझ शरिफ यांनी विजयाचा आनंद व्यक्त करताना पाकिस्तानी जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.

नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ पैकी १२५ पेक्षा जास्त जागांवर नवाझ शरिफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने आघाडी घेतली आहे . त्यापाठोपाठ इम्रान खानचा तेहरिक – ए – इन्सान ३५ जागांवर तर आसिफ झरदारी यांच्या सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पार्टीने अवघ्या ३३ जागांवर आघाडी घेतली आहे.शरिफ यांचा पक्ष बहुमताच्या आकड्याजवळ पोहचला असून शरिफ तिसऱ्यांदा पाकचे पंतप्रधान बनतील , हे जवळपास निश्चित मानले जात आहे . नवाझ शरिफ तसेच इम्रान खान हे मोठ्या मताधिक्याने जिंकले आहेत . अनेक जागांचे निकाल येवू लागले आहेत .

Leave a Comment