चोरट्या मांजरीमुळे वैतागले नागरिक

गोष्ट आहे न्यूझिलंडमधली. येथे एका चोरट्या मांजरीने लोकांच्या नाकात दम आणला असून, या मांजरीने आतापर्यंत ६० हून अधिक बुटांचे जोड आणि मोजता येणार नाहीत इतके कपडे चोरले आहेत. दिसायला मासूम अशी ही अवघ्या दोन वर्षांची मांजर पक्की चालू आहे. साऊथलॅन्ड टाईम्समध्ये आलेल्या बातमीत म्हटले आहे, की गस नावाची ही मांजर जन्मल्यापासूनच चोर्‍या करत आली आहे. सुरुवातीला ती शेजार्‍याच्या घरात घुसून वृत्तपत्र, चिप्स पॅकेट चोरायची. त्या वेळी तिच्या हरकती कौतुकाने घेतल्या जात होत्या. पण त्यामुळे तिची चोरीची सवय वाढतच गेली.

वयाच्या सहाव्या महिन्यापासून गस मोठ्या वस्तूंवर हात मारू लागली आहे. कपडे, अंडरवेयर चोरून आणत असताना गेल्या महिन्यांत तिची चोरीची रूची बदलली आहे आणि ती बूट चोरू लागली आहे. आतापर्यंत तिने साठहून अधिक बूट चोरून आणले. ही मांजर मेरेडिथ कॅली यांनी पाळली असून, त्या स्वतः मांजरीच्या कृत्यामुळे हैराण आहेत. कुणाच्या घरातून काहीही चोरी गेले की ते मेरेडिथच्या घरी येतात आणि मांजरीच्या नावाने शिव्याशाप देतात.

मेरेडिथ सांगतात, की मांजरीने चोरून आणलेल्या वस्तूंत मला काही रस नाही. त्यामुळे मी एक मोठा बॉक्स घरासमोर आणून ठेवला आहे. त्यात मांजरीने चोरलेल्या सर्व वस्तू ठेवल्या आहेत, ज्याच्या आहेत त्याने घेऊन जाव्या, असे त्यावर लिहून ठेवले आहे. पण तरीही लोक मांजरीला म्हणून मलाच शिव्या घालतात. मात्र याउप्परही मी या मांजरीला सोडू शकत नाही. कारण लहानपणापासून मी तिला सांभाळले आहे आणि  आता तिच्यात माझा जीव गुंतला आहे.

Leave a Comment