२ तासांत ९ वेळेस हार्टअॅटॅक येऊनही जिवंत

जाको राखे साइयां, मार सके न कोय… या उक्तीचा प्रत्यय लंडनमधील एका इलेक्ट्रीशियनच्या बाबतीत आला आहे. ही एखादी कल्पनाकथा वाटेल, पण सत्यात घडलेली घटना आहे. या ६६ वर्षीय व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल ९ वेळेस हार्टअॅटॅक आला. पण तरीही तो सहिसलामत बचावला. वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच असा चमत्कार घडला असून, खुद्द डॉक्टरही या घटनेमुळे हैराण आहेत. रे लेकॉम्बर असे या नशिबवानाचे नाव आहे.

घडले असे की घरी असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि दोनदा त्यांना हार्ट अॅटॅक आला. घरच्यांनी घाबरत घाबरत तातडीने हॉस्पिटलला फोन लावला आणि रूग्णवाहिका बोलावून घेतली. रूग्णवाहिका आल्यानंतर हॉस्पिटलपर्यंत नेत असतानाच त्यांना पुन्हा ४ वेळेस हार्ट अॅटॅक येऊन गेला. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर पुन्हा ३ वेळेस हार्ट अॅटॅक आला. अवघ्या दोन तासांत ९ वेळेस हार्ट अॅटॅक येऊनही रे लेकॉम्बर जिवंत आहेत, याबद्दल सर्वांनाच आश्चर्य आहे. लेकॉम्बर यांना दोन मुले आहेत.

त्यांच्या पत्नी ब्रेंडाने सांगितले, की आतापर्यंत लेकॉम्बर यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नव्हती. हार्टअॅटॅकमुळे प्रथमच ते हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. ज्या वेळी त्यांना रूग्णवाहिकेत ठेवले गेले, तेव्हा ते चांगले बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरून कुणालाही विश्वास वाटत नव्हता की त्यांना हार्टअॅटॅक येत आहेत. काही क्षण असे वाटले होते, की आता ते आपल्यात राहणार नाहीत, पण त्यांच्यावर देवाची कृपा आहे, हे या घटनेवरून मी जाणले आहे, असे त्या म्हणाल्या. डॉक्टरांनी तर संपूर्ण आयुष्यात आतापर्यंत अशी केस बघितली नव्हती, असे म्हटले आहे.