अंतराळातही होतील मुलांचे जन्म

अमेरिकन लोक सेक्स बाबत खुले असतात असे म्हटले जाते.नासाचे अंतराळवीर कित्येक महिने किवा काही वर्षेही अंतराळ मोहिमेवर असतात. तेंव्हा त्यांचे आपल्या महिला सहकार्‍याशी शरीर संबंध प्रस्थापित होतात का, असा प्रश्न आतापर्यंत तमाम सामान्यांना पडलेला आहे. त्याकडे नासाने अद्याप गांभीर्याने बघितले नव्हते. पण आता काही विशेषतज्ज्ञांनी त्या अनुषंगाने संशोधन करण्याचे आवाहन नासाला केले आहे.

अर्थात हे संशोधन वेगळ्याच कारानासती आहे. त्यांच्या मते, झिरो गुरूत्वाकर्षण स्थितीत गर्भधारणा होऊ शकते किंवा नाही, हे नासाच्या पुढाकाराने सिद्ध होऊ शकते. कॅलिफोर्निया येथील ब्रेन रिसर्च लेबोरेटरीचे डॉ. रेहॉन जोसेफ यांनी जर्नल ऑफ कॉस्मोलॉजी या मॅगेझिनमध्ये सेक्स ऑन मार्स या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखाद्वारे नासाला हे आवाहन केले आहे. फॉक्स न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर जगभरात याविषयावर चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. जोसेफ यांनी लिहिले आहे, की मनुष्य सेक्सबाबत सतत  विचार करतो. अंतराळवीर अंतराळात दीर्घकालीन यात्रेवर जात असेल तेव्हा तिथे विरंगुळ्याची साधने नसतात. त्यामुळे या अंतराळवीरांमध्ये भावनात्मक नाते तयार होण्याची शक्यता वाढते. हे नाते पुढे जाऊन शरीरसंबंधात बदलले तरी चुकीचे ठरत नाही. अंतराळात राहण्याचा काळच इतका मोठा असतो की अंतराळवीरांमध्ये संबंध प्रस्थापित झाल्यानंतर महिला अंतराळवीर गर्भवतीही होत असेल. मंगळ ग्रहावर अंतराळवीर पाठविताना नासाने या गोष्टींचा विचार करावा. यामुळे मंगळ ग्रहावर जन्मलेले बाळ पृथ्वीवर आल्यानंतर अनेक पिढ्यांनंतर ती एक नवीन प्रजाती ठरेल, असेही डॉ. जोसेफ यांनी म्हटले आहे.

नासाने अंतराळातील सेक्सबाबत कधीच खुलेपणाने मतप्रदर्शन केलेले नाही. अंतराळवीरांना नियम सांगताना एकमेकांप्रती चांगला व्यवहार ठेवा, असे सांगितले जाते. नासाच्या लँजली रिसर्च सेंटरचे प्रवक्ते माइकल फीनरएन यांनी सांगितले, की मंगळावर वस्ती निर्माण करण्याची कोणतीही योजना सध्या नासाच्या विचाराधिन नाही. अंतराळात किवा मंगळावर सेक्स किंवा गर्भधारणा याबाबत नासा संशोधन करत असल्याबद्दल आम्ही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. मात्र त्यामुळे या विषयाबाबत अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.